(Source: ECI | ABP NEWS)
'महाभारत' युद्धाच्या शुटिंगवेळी पंकज धीर यांच्या डोळ्यांत घुसलेला बाण; थोड्यात वाचले नाहीतर, नशीबी आलं असतं आजन्म अंधत्व
कुणीतरी ओरडलं ‘पंकज धीर अंध झाला!’ मी फक्त एवढंच विचार करत होतो की माझं करिअर आत्ताच सुरू झालंय, आता काय होणार?”

Pankaj Dheer: ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारून घराघरात ओळख निर्माण केलेले अभिनेते पंकज धीर यांचं 15 ऑक्टोबर 2025 रोजी 68व्या वर्षी निधन झालं. ते काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते. बी.आर. चोप्रांच्या या पौराणिक मालिकेतील कर्ण हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. मात्र, या भूमिकेसाठी पंकज धीर यांनी अक्षरशः आपल्या डोळ्यांचा जीव धोक्यात घातला होता. शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांच्या डोळ्यात बाण घुसला होता, आणि ते अंध होण्यापासून थोडक्यात वाचले होते. (Mahabharat War Scene Shooting)
युद्धाच्या सीनदरम्यान घडला जीवघेणा अपघात
बी.आर. चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान कर्ण (पंकज धीर) आणि अर्जुन (फिरोज खान) यांच्यातील युद्ध सीन चित्रीत केला जात होता. या सीनमध्ये अर्जुनाने सोडलेला बाण धनुष्यावर आदळून तुटायला हवा होता. मात्र, तांत्रिक चूक झाल्याने तो थेट पंकज धीर यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यात घुसला.
त्या प्रसंगाबद्दल पंकज धीर यांनी डीडी उर्दूला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, “बाण लागल्यावर रक्ताचा फव्वारा उडाला. सगळे घाबरले, कुणीतरी ओरडलं ‘पंकज धीर अंध झाला!’ मी फक्त एवढंच विचार करत होतो की माझं करिअर आत्ताच सुरू झालंय, आता काय होणार?”
वृद्ध डॉक्टरने वाचवली दृष्टी
त्या काळी फिल्मसिटी परिसरात योग्य सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांना जवळच्या एका छोट्याशा डिस्पेन्सरीत नेण्यात आलं, जिथे एक वृद्ध डॉक्टरांनी उपचार करून त्यांचा डोळा वाचवला. पंकज धीर यांनी सांगितलं होतं, “त्या छोट्याशा खोलीत बसलेल्या डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिलं, टाके घातले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. त्यांच्यामुळेच माझा डोळा वाचला,”
डोळ्यांवर पट्टी बांधून काम केले
पंकज धीर मुलाखतीत सांगितलं, “अपघातानंतर माझ्या डोळ्यावर मोठी पट्टी बांधलेली होती. पण तेव्हा बी.आर. चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी मला फोन केला आणि म्हणाले ‘पंकज, हा एपिसोड पुढे जायला हवा. तुला शूटिंग सुरू करावंच लागेल.’”
त्यामुळे त्यांनी पट्टी थोडी कमी करून एकाच डोळ्याने सीन पूर्ण केला. पंकज म्हणाले, “शूटिंग थांबवलं नाही, कारण सगळं यश त्या भूमिकेवर अवलंबून होतं. माझ्या चेहऱ्यावर फक्त एका बाजूने लाईट टाकून सीन शूट केला गेला, आणि त्या दिवसाचं काम पूर्ण झालं.”
फक्त 3 हजार रुपयांची मिळत होती फी
त्या काळात पंकज धीर यांना एका एपिसोडसाठी केवळ 3 हजार रुपये मिळत होते. पण त्यांनी दाखवलेलं समर्पण आणि अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. ‘महाभारत’मधील कर्णाचं पात्र हे पंकज धीर यांचं सर्वात लक्षवेधी काम ठरलं. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा तो ‘योद्धा कर्ण’ आजही लोकांच्या स्मरणात जिवंत आहे. ‘महाभारत’नंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि मालिका केल्या, पण त्यांच्या कारकिर्दीतील हा प्रसंग आजही बॉलीवूडमधील सर्वात थरारक अनुभवांपैकी एक मानला जातो.
























