एक्स्प्लोर
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा ईद दरम्यान प्रदर्शित करू देऊ नये, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आल्या होत्या, एवढंच नाही तर, 'उडता पंजाब'ला सेन्सॉर प्रमाणपत्रच देऊ नये यासाठीही मोठा दबाव आल्याचा गौप्यस्फोट पहलाज निहलानींनी केला.
मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर आता त्यांनी याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये उडता पंजाब पासून सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमासाठी केंद्र सरकारकडून कसे आदेश मिळाले, याचाही त्यांनी उलगडा केला.
लहरे या यूट्यूब चॅनलसाठी सिने-समीक्षक भारती प्रधान यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींपासून ते थेट दिग्दर्शक अनुराग कश्यपपर्यंत अनेक जणांवर गंभीर आरोप केले आहेत.
‘स्मृती इराणींनीच मला पदावरुन बाजूला सारलं’
स्मृती इराणी म्हणजे वाद. त्याना आजपर्यंत जे-जे मंत्रालय मिळालं तिथं-तिथं वाद झाले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालय मिळताच तिथंही आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. सुरुवातीलाच त्यांनी मला ‘इंदू सरकार’ कोणत्याही कटशिवाय क्लीअर करण्यास सांगितलं. मी नियमावलीनुसार योग्य ते कट सुचवले. त्यामुळे स्मृती इराणींचा इगो दुखावला. म्हणूनच त्यांनी मला पदावरुन बाजूला केलं.
‘मला हटवण्यामागे एकता कपूरचा हात नाही’
‘स्मृती इराणी आणि एकता कपूर यांच्या मैत्रीमुळे मला पदावरुन दूर करण्यात आलं. अशीही चर्चा होती. पण मला हटवण्यामागे एकता कपूरचा कोणताही हात नाही.’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘...तर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाची कमाई झालीच नसती’
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमावरुन माझ्यावर बरेच आरोप झाले. सुरुवातीला या सिनेमाला मान्यता मिळाली नव्हती पण नंतर ट्रिब्युनलमध्ये हा सिनेमा क्लिअर झाला. पण यादरम्यान जे काही वाद झाले त्यामुळे या सिनेमाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि म्हणूनच या सिनेमानं चांगली कमाई केली. नाहीतर फार कमाई झाली नसती.’ असंही निहलानी यांनी सांगितलं.
‘उडता पंजाबला परवानगी देऊ नका असं मला सांगण्यात आलं होतं’
‘उडता पंजाब’ या सिनेमावरुन बरेच वाद झाले. त्यावरुन निहलानींवर टीकाही झाली. याबाबतही निहलानी यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘उडता पंजाब’ प्रदर्शित होता कामा नये, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मला स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं होतं. यासाठी माझ्यावर बऱ्याच बऱ्याच ठिकाणाहून दबावही टाकण्यात आला होता. पण कोणत्याही दबावाखाली न येता मी मार्गदर्शक तत्वानुसार सिनेमा प्रदर्शनला मान्यता दिली.’ असंही ते म्हणाले.
‘गृह मंत्रालयानं ईदपर्यंत ‘बजरंगी भाईजान’ला परवानगी देऊ नका असं सांगितलेलं’
‘उडता पंजाबच नाही तर ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा ईदमध्ये प्रदर्शित होऊ नये असं मला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं. पण तरीही मी दबाव न झुगारता या सिनेमाला परवानगी दिली. पण या मधल्या काळात मलाच व्हिलन ठरवण्यात आलं.’ असा धक्कादायक आरोपही निहलानी यांनी केला.
‘दिग्दर्शक कबीर खान निरुपयोगी आणि अव्यावसायिक माणूस’
‘बजरंगी भाईजान सिनेमा ईदला प्रदर्शित होऊ न देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. त्यादरम्यान सलमान आणि दिग्दर्शक कबीर खान यांच्या दृष्टीनं मी व्हिलन ठरलो होतो. कबीर खान हा माणूस तर अक्षरश: निरुपयोगी आणि अव्यावसायिक माणूस आहे. मी त्याच्या सिनेमात कधीच कोणतेही कट सुचवलेले नसतानाही तो कायम माझ्याविरुद्ध बोलत होता.’ असं म्हणत निहलानी यांनी कबीर खानवरही निशाणा साधला.
‘अनुराग कश्यप सिनेमाबाबत मुद्दाम वाद घडवून आणतो’
‘दिग्दर्शक कबीर खानसोबतच निहलानी यांनी दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावरही जोरदार टीका केली. अनुराग कश्यपनं काय आणि कसे सिनेमे बनवले आहेत हे लोकांना माहित आहे. दर्जा नसलेले, आक्षेपार्ह कथा अशाप्रकारचेच अनेक सिनेमे त्यानं बनवले आहेत. अशा सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्याने स्वत: वाद घडवून आणले आणि मला टार्गेट केलं. इतकंच नव्हे तर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमासाठी त्यानं हेराफेरी करुन सिनेमातील आक्षेपार्ह शब्दांना मान्यता मिळवली. त्याची ती फाईल मी स्वत: पाहिली आहे.’ असा आरोपही त्यांनी केला.
‘इथंही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे’
सिनेमाला परवानगी मिळावी यासाठी बोर्डच्या ऑफिसातही बराच भ्रष्टाचारही होतो. असा आरोपही निहलानी यांनी केला. ‘इथं अनेक एजंट, मध्यस्थी यासाठी काम करतात. इतकंच नाही तर सिनेमाच्या एका प्रोमोसाठी काही जणांना हजारो रुपयांची लाच दिली जाते.’ असा गंभीर आरोप निहलानी यांनी केला आहे.
‘प्रसून जोशी चांगला माणूस आहे’
‘प्रसून जोशी हा चांगला माणूस आहे. मी केलेले पाप-पुण्य आता यापुढे त्याला भोगावे लागणार आहेत.’ असंही त्यांनी मुलाखतीच्या शेवटी सांगितलं.
दरम्यान, निहलानी यांच्या या मुलाखतीनं अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. या सर्व गोष्टींकडे सरकार काही लक्ष देणार की, सोयीस्कररित्या याकडे कानाडोळा करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
VIDEO:
संबंधित बातम्या :
प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष, पहलाज निहलानी यांना डच्चू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement