N D Mahanor Passes Away: "जैत रे जैत", 'एक होता विदूषक' या चित्रपटांमधील गाण्यांचे गीतकार ना धों महानोर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या गाण्यांबद्दल...
ना. धों. महानोर (N D Mahanor) यांनी अनेक मराठी चित्रपटांमधील गाणी लिहिली. जाणून घेऊयात त्यांनी गाण्यांबद्दल...
N D Mahanor Passes Away: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे.वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी लिहिलेल्या गाण्यांमध्ये तसेच कवितांमध्ये निसर्गाचा उल्लेख होता. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना. धों. महानोर यांनी अनेक मराठी चित्रपटांमधील गाणी लिहिली आहेत. जाणून घेऊयात त्यांनी गाण्यांबद्दल...
ना. धों. महानोर यांची गाणी
1977 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या "जैत रे जैत" या चित्रपटामधील गाणी देखील ना. धों. महानोर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटामधील मी रात टाकली, नभं उतरु आलं,आम्ही ठाकर ठाकर,जांभूळ पिकल्या झाडाखाली, असं एखादं पाखरु वेल्हाळ,डोंगर काठाडी ठाकरवाडी या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ना. धों. महानोर यांनी सर्जा , एक होता विदूषक,अबोली,मुक्ता,दोघी या चित्रपटांमधील गाणी लिहिली.
ना. धों. महानोर यांच्या जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, गंगा वाहू दे निर्मळ,गावातल्या गोष्टी या कविता कथासंग्रहांना देखील वाचकांची विशेष पसंती मिळाली.
चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी एबीपी माझाला ना. धों. महानोर यांच्या गाण्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "एखाद्या कवीला चित्रपटासाठी गीतलेखनाची संधी मिळते तेव्हा त्या कवीच्या लेखन वैशिष्ट्यानुसार ती असणे आवश्यक असते. निसर्ग कवी म्हणून ओळखले गेलेल्या ना. धों. महानोर यांनी मोजक्याच चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्यातील प्रतिभेला त्यात वाव मिळाला. त्यात त्यांचे कवी असणे अधोरेखीत झाले. चित्रपटासाठीच्या त्यांच्या काही काव्यरचना सांगायच्या तर, डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'जैत रे जैत 'मधील डोंगर काठाडी ठाकरवाडी , आम्ही ठाकर ठाकर, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो तसेच राजदत्त दिग्दर्शित 'सर्जा 'मधील चिंब पावसाने रान झालं आबादानी, मी काट्यातून चालून थकले, नीतिन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित 'अजिंठा ' या चित्रपटातील डोळ्यांना डसले पहाड, चिंब झाली, मन चिंब पावसाळी, बगळ्या बगळ्या फुलं दे या गाण्यांचा उल्लेख करता येईल. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांचे काव्यलेखन त्यांना साहित्यिक म्हणून ओळख देणारे ठरले. त्यांची ती ओळख चित्रपट काव्यलेखनात अधोरेखित होतेय."
ना धों महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी इथे झालं. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.
इतर महत्वाच्या बातम्या:
N D Mahanor: 'अखेर हा वृक्ष उन्मळून पडला...'; शरद पवारांकडून ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली