एक्स्प्लोर
मायलेकराच्या शोधाची कहाणी 'अाराॅन'
हा चित्रपट भावनाप्रधान असल्यामुळे किमान पक्षी तो खिळवून ठेवतो. पण अनेक बारकावे राहून गेल्यामुळे त्या भावनांचा आलेख नेमका समोर येत नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स. याची पटकथा आणखी कसून बांधली असती तर याचा परिणाम आणखी वेगळा झाला असता.
सिनेमाचं नाव लक्षात घेता हा नेमका कशावर बोलतो ते कळेनासं होतं. म्हणजे, गेल्या काही वर्षापासून असा ट्रेंड आला आहे. अगदी वानगीदाखल द्यायची तर फॅंड्री, सैराट, यलो ही त्याची काही उदाहरणं असू शकतात. अराॅन आला तेव्हा, हा सिनेमा नेमका कशावर आहे ते काही केल्या कळेना, पण याची जाहिरात करताना मराठी आणि इंग्लिश असा हा मिंग्लिश सिनेमा असल्याची चर्चा झाली. शशांक केतकर, नेहा जोशी यांच्यासह स्वस्तिका मुखर्जी ही बंगाली अभिनेत्री यात काम करते आहे. सिनेमातलं बहुतांश चित्रिकरण पॅरीसमध्ये झालं आहे, ते पाहता सिनेमावर पुरेसा खर्च केल्याचंही लक्षात येतं. पण आता मुद्दा राहतो तो असा की सिनेमा नेमका आहे कशावर?
तर सिनेमाची गोष्ट सोपी साधी आहे. वडील अकाली गेल्यामुळे आईने आपल्या मुलाला काकाकडे ठेवलं आहे. त्याला काही वर्षं उलटली आहेत. ही आई आता पॅरीसमध्ये असते. पत्राद्वारे ही आई आपल्या मुलाशी संवाद साधत असते. काही वर्ष उलटतात. इकडे काका आणि मुलाच्या काकूला या मुलाचा बाबूचा लळा लागला आहे. पोटच्या पोराची माया ते मुलावर करतात. पण आता मुलाला ओढ आहे ती आईची. काका बाबूला घेऊन पॅरीसला जायचं ठरवतात आणि तिथे या माय-लेकराची भेट घडवून आणायची ठरते. तर हा काका आणि बाबू पॅरीस गाठतात खरं. पण तिथे दिलेल्या पत्त्यावर आई नसतेच. मग सुरू होतो तिचा शोध. त्याची ही गोष्ट आहे, आराॅन.
यात काका आणि काकूची व्यक्तिरेखा साकारली आहे ती शशांक केतकर आणि नेहा जोशी यांनी. तर बाबूची व्यक्तिरेखा साकारली आहे अथर्व पढे याने. आणि फ्रान्सला गेलेली आई आहे, स्वस्तिका मुखर्जी. या चित्रपटात भाव आहेत. पण त्यासाठी आवश्यक प्रसंगांच्या साखळीची उणीव आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंग मोठा झाला आहे. शिवाय, तो काही प्रमाणात लाऊडही वाटतो सिनेमा पाहताना, बाबूची आई आणि बाबू यांच्यातली ताटातूट नेमकी कधी झाली.. त्याला किती काळ लोटला.. हे नेमकं लक्षात येत नाही. नेहा जोशी आणि शशांक केतकर यांनी काही प्रसंग अत्यंत भावोत्कट साकारले आहेत खरं. पण त्यासाठी एकापाठोपाठ येणारे प्रसंग कमी पडतात. त्यामुळे एकच प्रसंग प्रमाणापेक्षा जास्त ताणतोय की काय असं वाटतं.
दिग्दर्शक ओंकार रमेश शेट्टींचा हा चित्रपट भावनाप्रधान असल्यामुळे किमान पक्षी तो खिळवून ठेवतो. पण अनेक बारकावे राहून गेल्यामुळे त्या भावनांचा आलेख नेमका समोर येत नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स. याची पटकथा आणखी कसून बांधली असती तर याचा परिणाम आणखी वेगळा झाला असता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्राईम
भारत
वर्धा
Advertisement