वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकानं जबरदस्ती Kiss करण्याचा केला प्रयत्न; 'बिग बॉस'फेम मालती चाहरचा धक्कादायक खुलासा, कास्टिंग काउचवर स्पष्टच म्हणाली ..
मालती चहरच्या या धक्कादायक खुलाशांमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील कास्टिंग काउचचा विषय चर्चेत आला आहे.

Bigg Boss 19 Malti Chahar: बिग बॉसच्या 19व्या सीजनमध्ये झळकलेली मालती चाहर (Malti Chahar) घराघरात पोहोचली. नुकताच मालतीने इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचचा कटू अनुभव सांगितला आहे. करिअरच्या सुरुवातीला मालतीशी एका दिग्दर्शकाने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक अनुभव तिने सांगितला. तर एका वयस्कर फिल्ममेकरने जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला होता असं तिने सांगितलंय. अनिल शर्मा यांच्या जिनियस चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलेल्या मालतीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे सगळं उघड केलं. ती म्हणाली की करिअरच्या सुरुवातीच्या काळात हे सगळं घडलं आणि या घटनांनी तिला मानसिक धक्का बसला होता. (Malti Chahar on Casting Couch)
Malti Chahar:नेमकं काय म्हणाली मालती?
क्रिकेटर दीपक चाहरची बहिण असलेल्या मालतीला करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचे विचित्र अनुभवही आले. सिद्धार्थ कन्ननशी बोलताना मालती म्हणाली की इंडस्ट्रीत कोणीच आपलं नसतं, हे तिला लवकरच कळून चुकलं. “कधी कधी लोक चान्स मारतात. मी माझ्या वडिलांनाही सांगितलं आहे की एक-दोन वेळा असं झालंय. काही जण बोलतात, एकाने खोडसाळपणाही केला. पण लोक तुमची बॉडी लँग्वेज ओळखतात. मी एअरफोर्स बॅकग्राउंडमधून आले आहे, त्यामुळे ते माझ्या वागण्यात दिसतं,” असं ती म्हणाली.
वडिलांसमान दिग्दर्शकाने किस करण्याचा केला प्रयत्न
मालतीने आणखी एक धक्कादायक अनुभव सांगितला. एका प्रोजेक्टसाठी ती वारंवार एका वयस्कर दिग्दर्शकाला भेटत होती. काम संपल्यानंतर तिने औपचारिकपणे साइड हग केलं, पण त्या दिग्दर्शकाने थेट ओठांवर किस करण्याचा प्रयत्न केला.“मी अक्षरशः सुन्न झाले होते. तो माझ्यासाठी वडिलांसारखा होता. मी त्यांना तिथेच थांबवलं आणि त्यानंतर कधीच भेटले नाही. त्या घटनेने मला शिकवलं की कोणालाही ‘बाप’ मानायचं नाही. सगळ्यांपासून सावध राहायचं,” असं ती म्हणाली.
‘कॉम्प्रोमाइज नाही तर काम नाही’
मालती पुढे म्हणाली, “लोकांना समजलं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, की मग काम देत नाहीत. लुक टेस्ट होऊनही शेवटच्या क्षणी तुम्हाला रिप्लेस केलं जातं. हे माझ्यासोबत अनेकदा झालं आहे.” तिने हेही स्पष्ट केलं की इंडस्ट्रीत मुलींच्या हातातही बरंच काही असतं. “तुम्हाला ठाम राहावं लागतं. वडिलांनी मला सांगितलं होतं, काही जमलं नाही तर घरी परत ये, पण चुकीचा मार्ग निवडू नकोस,” असंही ती म्हणाली.
हॉटेलच्या रूममध्ये बोलावल्याचा प्रकार
एका साऊथ दिग्दर्शकाने मीटिंगसाठी थेट हॉटेलचा रूम नंबर दिला होता, असा अनुभवही मालतीने सांगितला.“मी तिथे गेलेच नाही. मी स्पष्ट विचारलं, मीटिंग करायची असेल तर सगळ्यांसमोर बाहेर करूया. रूममध्ये का? त्यांनी म्हटलं, ‘इंडस्ट्रीत असंच चालतं.’ तेव्हा मी उत्तर दिलं, ‘मला समजावून सांगा, मला माहीत नाही,’” असं मालतीने सांगितलं. मालती चहरच्या या धक्कादायक खुलाशांमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील कास्टिंग काउचचा विषय चर्चेत आला आहे.























