पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच मल्याळम सिने-निर्माते जोसेफ मनु जेम्स यांचे निधन; वयाच्या 31 व्या वर्षी अखेरचा श्वास
Joseph Manu James Death : मल्याळम सिने-निर्माते जोसेफ मनु जेम्स यांचे निधन झाले आहे. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Joseph Manu James Passed Away : मल्याळम सिने-निर्माते जोसेफ मनु जेम्स (Joseph Manu James) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र केरळमधील (Kerala) अलुवा येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जोसेफ यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
जोसेफ यांचा पहिला सिनेमा 'नॅन्सी रानी' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!
जोसेफ (Joseph Manu James Death) यांचा पहिला सिनेमा 'नॅन्सी रानी' (Nancy Rani) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अहाना कृष्णा (Ahaana Krishna) आणि अर्जुन अशोकन (Arjun Ashokan) मुख्य भूमिकेत आहेत. सध्या या सिनेमाच्या पोस्ट-प्रोडक्शनचं काम सुरु असून लवकरच हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अहाना आणि अर्जुनसह अजु वर्गीज, श्रीनिवासन, इंद्रांस, सनी वेन, लेने आणि लाल हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
जोसेफ यांच्या निधनानंतर अहान आणि अजूने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. अहानने लिहिलं आहे, "मनू यांच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्ही जगाचा निरोप घ्यायला नको होता". तर दुसरीकडे अजूने जोसेफ यांचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, "भावा, खूपच लवकर गेलास." अहान आणि अजूच्या पोस्टवर मल्याळम सिनेसृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
जोसेफ मनु जेम्स यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who iS Joseph Manu James)
जोसेफ मनु जेम्स यांनी अभिनेता म्हणून 2004 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी साबू जेम्सच्या 'आय अॅम क्यूरियस' (I am Curious) या सिनेमात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी मल्याळम आणि कन्नड सिनेमात छोट्या-मोठ्या भूमिका साकारत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं. हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांनी काम केलं आहे. जोसेफ मनु जेम्स यांनी एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. जोसेफ यांच्या पश्चात पत्नी मनु नैना आहे.
संबंधित बातम्या