Majha Katta : वयाच्या 12 व्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात गायलेले पंडित अजय पोहनकर! 'माझा कट्ट्या'वर उलगडली सुपरहिट 'पिया बावरी' अल्बमची गोष्ट
Ajay Pohankar Abhijit Pohankar : पंडित अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी 'पिया बावरी' (Piya Bawri) या सुपरहिट गाण्याची गोष्ट उलगडली गेली.
Ajay Pohankar Abhijit Pohankar : शास्त्रीय संगीतातलं श्रेष्ठ आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व पंडित अजय पोहनकर (Ajay Pohankar) आणि आपल्या कीबोर्ड अन् फ्युझन म्युझिकने शास्त्रीय संगीत जगभरात पोहोचवणारे अभिजित पोहनकर (Abhijit Pohankar) यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी 'पिया बावरी' (Piya Bawri) या सुपरहिट गाण्याची गोष्ट उलगडली गेली. पंडित अजय पोहनकर यांनी वयाच्या 12 व्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात आपली कला सादर केली होती.
वयाच्या 12 व्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात गायलेले पंडित अजय पोहनकर!
माझा कट्ट्यावर आपल्या संगीताच्या संस्कारांबद्दल बोलताना पंडित अजय पोहनकर म्हणाले,"इतके वर्ष संगीतक्षेत्रात काम करतोय याच नक्कीच आनंद आहे. आई-वडीलांमुळे मला संगीताची गोडी निर्माण झाली. लहानपणी अनेक दिग्गज कलाकार घरी येत असे. त्यावेळी त्यांची गाणी ऐकायली मिळाली. वयाच्या 12 व्या वर्षी मी सवाई गंधर्व महोत्सवात कला सादर केली. त्यावेळी डॉ. वसंतराव देशपांडे, बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यांनी फक्त माझं कौतुकचं केलं नाही तर माझ्या कलेचा आदरदेखील केला".
पंडित अजय पोहनकर म्हणाले,"आई-वडिलांनी माझं फार कौतुक, लाड केले नाहीत. अजून खूप काम करायचं आहे, हे सतत ऐकत होतो. त्यामुळे डोक्यात कधी हवा गेली नाही. वडील वकील आणि आई प्राध्यापिका असल्यामुळे शिक्षणाचं महत्त्वं माहिती होतं. तुम्ही शिक्षित असाल तर तुमची दृष्टी वाढते असे संस्कार घरात देण्यात आले होते. आमच्या घरी सर्व पद्धतीचं संगीत ऐकलं जायचं".
अभिजित जेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये गायचा...
पंडित अजय पोहनकर यांचा मुलगा अभिजित पोहनकर याने आपल्या कीबोर्ड अन् फ्युझन म्युझिकने शास्त्रीय संगीत जगभरात पोहोचवलं आहे. आपल्या संगीतप्रवासाबद्दल बोलताना अभिजित म्हणाला,"ऑर्केस्ट्रामध्ये गाणं गात माझ्या संगीतप्रवासाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर सात-आठ वर्षांनी मला जाणवलं की हार्मोनियमवर माझा हात चांगला बसला आहे. पुढे मी कीबोर्ड वाजवायला लागलो. आणि अशाप्रकारे शास्त्रीय संगीताच्या मैफलीत कीबोर्ड आला".
सुपरहिट 'पिया बावरी' अल्बमची गोष्ट
अभिजित म्हणाला,"शास्त्रीय संगीतात वेगवेगळे प्रयोग व्हायला हवेत असं मला नेहमी वाटायचं. एका वेगळ्या प्रेक्षकवर्गापर्यंत शास्त्रीय संगीत पोहोचावं या उद्देशाने 'पिया बावरी' अल्बमची निर्मिती करण्यात आली. वडिलांना मी वेगळ्या पद्धतीने शास्त्रीय गाणी गायला लावली. तो प्रयोग 'पिया बावरी' या नावाने लोकप्रिय आहे. या प्रयोगासाठी वडिलांना थोडं समजावून सांगावं लागलं. पण मार्केटमध्ये जेव्हा हा अल्बम आला तेव्हा त्याचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. शास्त्रीय संगीताच्या चौकटीत राहून तुम्ही जेव्हा वेगळ्या जॉनरमध्ये जाता तेव्हा ती कलाकृती आणखी सुरेख होते. पिया बावरीनंतरही आम्ही वेगवेगळे प्रयोग केले".
'बॉलिवूड घराना' कसं जन्माला आलं?
'बॉलिवूड घराना'बद्दल बोलताना अभिजित म्हणाला,"बॉलिवूड आणि 'घराना' म्हणजे शास्त्रीय, अशा दोन्हीचा समावेश होऊन एक संगीत होतं आणि दोन्हीचा प्रेक्षकवर्ग ते ऐकतो त्याला 'बॉलिवूड घराना' म्हटलं जातं. 'बॉलिवूड घराना'च्या माध्यमातून बॉलिवूड प्रमोट करत नाही. शास्त्रीय संगाताची आवड नसणाऱ्यांना ते संगीत आवडलं पाहिजे हा यामागचा उद्देश आहे.
संबंधित बातम्या