Movies Based On Cricket : बॉलिवूडलाही क्रिकेट विश्वाची भुरळ! ‘लगान’ ते ‘कौन प्रवीण तांबे’ क्रिकेटवर आधारित ‘हे’ सिनेमे नक्की पाहा!
Movies Based On Cricket : बॉलिवूडमध्येही असे अनेक सिनेमे तयार झाले, ज्यांच्या कथा क्रिकेट या खेळावर आधरित होत्या. यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चौकार, षट्कार लगावले. तर, काहींची मात्र थेट विकेटच पडली.
Movies Based On Cricket : लहान असो वा मोठे, क्रिकेटची जादू अगदी कुणालाही भुरळ घालू शकते. मग, यात बॉलिवूड कसं बरं मागे राहिलं... बॉलिवूडमध्येही असे अनेक सिनेमे तयार झाले, ज्यांच्या कथा क्रिकेट या खेळावर आधरित होत्या. यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चौकार, षट्कार लगावले. तर, काहींची मात्र थेट विकेटच पडली. मात्र, क्रिकेटवर आधारित या सिनेमांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. प्रत्येक चित्रपटातून या खेळाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांच्या समोर आली. चला तर, जाणून घेऊया अशाच क्रिकेटवर आधारित काही चित्रपटांबद्दल...
जर्सी
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूरचा 'जर्सी' सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केलं आहे. हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली नाही. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
कौन प्रवीण तांबे?
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा 'कौन प्रवीण तांबे' हा सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या सिनेमा क्रिकेटर प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
83
रणवीर सिंहच्या '83' सिनेमाचे कथानक 1983 च्या विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केलं आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. कपिल यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाला चांगली कमाई करता आली नाही.
सचिन अ बिलियन ड्रीम्स
'सचिन अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा 2017 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जेम्स अर्सकिनने सांभाळली होती. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटींचा गल्ला जमवला होता.
एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी
'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा 2016 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात एम एस धोनीचे पात्र दिवंगत अभिनेता सुशांत सिंहने साकारली होती. या सिनेमामुळे सुशांत सिंहला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. हा सिनेमा महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली होती.
इकबाल
2005 साली प्रदर्शित झालेला 'इकबाल' हा क्रीडाविषयक सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नागेश कुकुनूरने सांभाळली होती. या सिनेमात श्रेयस तळपदे, नसीरुद्दीन शाह, गिरिश कर्नाड मुख्य भूमिकेत आहेत. कर्नबधिर मुलाच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाने 5.6 कोटींची कमाई केली होती.
लगान
15 जून 2001 ला 'लगान' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. नुकतेच या सिनेमाला 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. आमिर खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. 2001 साली या सिनेमाने भारतात 53 कोटींचा गल्ला जमवला होता. तसेच या सिनेमाला आयफा, फिल्मफेअर सारखे आंतराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले होते.
जन्नत
कुणाल देशमुख दिग्दर्शित 'जन्नत' हा सिनेमा 2008 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात इमरान हाशमी मुख्य भूमिकेत होता. क्रिकेट सामन्यांवर लागणाऱ्या सट्टेबाजीवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाची कथा आणि गाणी अप्रतिम आहेत. त्यामुळेच अवघ्या 10 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाने 30 कोटींचा पल्ला गाठला.
अजहर
'अजहर' हा सिनेमा माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर आधारित आहे. या सिनेमात इमरान हाश्मी आणि प्राची देसाईची जोडी दिसून आली होती. या सिनेमात माजी क्रिकेटपटूच्या आयुष्यासंबंधित वाद खूप जवळून दाखवण्यात आला होता. या सिनेमाने 33 कोटींची कमाई केली होती.
हेही वाचा :
Shamshera: 'शुद्ध सिंह'; 'शमशेरा'मधील संजय दत्तचा दमदार लूक पाहिलात का?