Aamir Khan Kiran Rao : आमिर खान, किरण राव सुप्रीम कोर्टाची पायरी चढणार? खुद्द सरन्यायाधीशांनी बोलावणं धाडलं!
Aamir Khan Kiran Rao In Supreme Court: "मिस्टर परफेक्शनिस्ट" आमिर खान आणि किरण राव आज सुप्रीम कोर्टाची पायरी चढणार आहे. खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीच या दोघांना बोलावणं धाडलं आहे.
Aamir Khan Kiran Rao In Supreme Court: बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) आज सुप्रीम कोर्टाची (Supreme Court) पायरी चढणार आहे. खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीच या दोघांना बोलावणं धाडलं आहे. मात्र, हे बोलावणं कोणत्या खटल्याशी संबंधित नाही तर कौतुक करण्यासाठी आणि न्यायाधीश, त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधण्यासाठी आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने आज सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित 'लापता लेडीज' चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.
हा उपक्रम सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी चालवल्या जाणाऱ्या वर्षभर चालणाऱ्या लैंगिक संवेदनशीलता कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही कल्पना सरन्यायाधीशांची पत्नी कल्पना दास यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना सुचली.
सरन्यायाधीशांनी काय म्हटले?
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बार अॅण्ड बेंचला सांगितले की, 'सुप्रीम कोर्टातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्याचा माझा हा उपक्रम आहे आणि म्हणूनच ही स्क्रिनिंग केली जात आहे. अशा अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालयात घडत आहेत, ज्यांची अनेकदा प्रसिद्धी होत नाही. आता प्रमाणे आमच्याकडे सुप्रीम कोर्टाच्या कर्मचाऱ्यांच्या उपचार आणि आरामासाठी आयुर्वेदिक क्लिनिकची चोवीस तास सुविधा उपलब्ध आहे. हे स्क्रीनिंग सदस्यांमधील परस्पर संबंधांसाठी देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
कधी होणार स्क्रिनिंग?
लापता लेडीज चित्रपटाचे स्क्रिनिंग सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय भवनातील सभागृहात, आज 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सरन्याधीश यांच्यासह कोर्टातील इतर न्यायाधीश आपल्या कुटुंबातील सदस्यांसह उपस्थित राहणार आहेत.
ओटीटीवर रिलीज झालाय चित्रपट
हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही कथा दोन नववधूंची आहे. या नववधू लग्नानंतर सासरी जात असताना ट्रेनमध्ये बदल्या जातात. चित्रपटाचे बजेट 4-5 कोटी रुपये होते आणि 25 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी कौतुक केले.