कपिल देव यांची मुलगी बॉलिवूडमध्ये, रणवीर सिंहसोबत करणार एन्ट्री
कपिल देव यांच्या नेतृत्त्वात 1983 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. तो क्षण आजही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. '83' हा सिनेमा भारताच्या याच ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83' या सिनेमाची निर्मिती सुरु झाली आहेत. या सिनेमात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात रणवीरसोबत कपिल देव यांची मुलगी अमिया सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल देव यांची मुलगी अमिया '83' सिनेमातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दिची सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांनी भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.
अमिया कबीर खान यांना असिस्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या सिनेमात क्रिकेटर संदीप पाटील यांच्या भूमिकेत त्यांचा मुलगा चिराग पाटील दिसणार आहे.
चिराग पाटीलने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमियाबाबत माहिती दिली. " '83' सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी अमिया आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. ती आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये उपस्थित असते. मात्र ती दिग्दर्शकांच्या टीमचा भाग आहे. ती कबीर खान यांच्यासोबत मोठ्या उत्साहात काम करताना दिसते", असं चिरागने सांगितलं.
कपिल देव यांच्या नेतृत्त्वात 1983 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. तो क्षण आजही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. '83' हा सिनेमा भारताच्या याच ऐतिहासिक विजयावर आधारित आहे, मात्र कपिल देव सिनेमाचे केंद्रबिंदू असणार आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.