Kangana Ranaut : मलाही सुशांत सिंहसारखं टोकाचं पाऊल उचलावं असं वाटतं होतं; कंगनाचं कोर्टात वक्तव्य
Kangana Ranaut : जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणातील सुनावणीत कंगनाने अंधेरी कोर्टात आपल्या मनातदेखील सुशांत सिंह राजपूत सारखे आत्महत्येचे विचार आले होते
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यातील कायदेशीर लढाई मागील काही वर्षांपासून सुरू आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणातील सुनावणीत कंगनाने अंधेरी कोर्टात (Andheri Court) आपल्या मनातदेखील सुशांत सिंह राजपूत सारखे आत्महत्येचे विचार आले होते असे म्हटले.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाने कोर्टाला सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर माझ्या मनातही आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. सिनेसृष्टीत आऊटसाईडर, बाहेरील व्यक्तींना खूप त्रास दिला जातो. त्यांचा छळही केला जातो. सुशांत सिंह राजपूत आणि मलादेखील याच अनुभवातून जावे लागले होते, असे कंगनाने म्हटले. 2016 मध्ये अभिनेता हृतिक रोशनसोबत वाद सुरू होता. त्यावेळी जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावले आणि धमकी दिली असल्याचा आरोप कंगनाने केला. मात्र, जावेद अख्तर यांनी हे आरोप फेटाळून लावले.
जावेद अख्तर यांचे नाव या कारणाने घेतले...
कंगनाने सांगितले की, या मीटिंगनंतर खूपच हताश झाली होती. मुलाखतीत बोलण्याच्या ओघात आपण जावेद अख्तर यांचे नाव घेतले असल्याचे कंगनाने म्हटले. बॉलिवूडमधून बाहेरील व्यक्तींचा कसा छळ केला जातो, त्यांच्यासोबत दुजाभाव केला जातो हे लोकांना या मुलाखतीतून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, असे कंगनाने म्हटले. आपल्याला कोणी लक्ष्य करत असेल तर आपणही त्यांना लक्ष्य करावे हे माझ्या स्वभावात नसल्याचे कंगनाने म्हटले.
जावेद अख्तर यांचे वकील कंगनाची उलटतपासणी पुढील सुनावणीत करणार आहे.
View this post on Instagram
प्रकरण काय?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह विधानं केली होती. त्याला कंगनाची बहिणी रंगोली चंदेलनही दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट केल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत फौजदारी मानहानीचा खटला दाखल आहे.