'जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं'; नाव न घेता जया बच्चन यांचा रवी किशन यांच्यावर हल्लाबोल
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान रवी किशन आणि जया बच्चन यांच्यातही वाकयुद्ध रंगल्याचं दिसून आलं.

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी यावर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर आता खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन यांनी कोणाचंच नाव न घेता 'जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है' असं म्हणत रवी किशन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जया बच्चन संसदेत बोलताना म्हणाल्या की, 'चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे अत्यंत लज्जास्पद आहे. मी कोणाचंही नाव घेत नाहीये. ते स्वतःही याच इंडस्ट्रीत काम करतात. जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है. ही चुकीची गोष्ट आहे. मला आता सांगावं लागत आहे की, इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे.'
काय म्हणाले होते रवी किशन?
सोमवारी लोकसभेत बोलताना रवी किशन म्हणाले होते की, 'भारतीय चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जची सवय वाढत आहे. अनेक लोकांना अटकही करण्यात आली आहे. एनसीबी चांगलं काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करत आहे की, त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, दोषींना लवकरात लवकर पकडा आणि त्यांना शिक्षा द्या. ज्यामुळे शेजारील देशांच्या कारस्थानांचा अंत होईल.'
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून अटक करण्यात आली आहे. कंगना रनौतने या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी बॉलिवूडकरांवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये 99 टक्के लोक ड्रग्ज घेतात. तसेच रियानेही एनसीबीला दिलेल्या जबाबात 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, सुशांत ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानसह बॉलिवूडच्या 25 जणांची नावं हाती नसल्याची एनसीबीने दिली आहे. तसेच ड्रग्स खरेदी-विक्री करणाऱ्या 17 जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'ही' नावं आली कुठून? रियाने कुणाचंही नाव न घेतल्याचा सरकारी सूत्रांचा दावा
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मिम्स शेअर करत कंगनाकडून मराठीत ट्वीट
- शिवसेना कार्यकर्त्यांकडून नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण, कंगना म्हणाली...
- खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर























