'ही' नावं आली कुठून? रियाने कुणाचंही नाव न घेतल्याचा सरकारी सूत्रांचा दावा
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीच्या जबाबात काही नावं बाहेर आल्याचं बोललं गेलं. त्याता सारा अली खान, रकुलप्रीत सिंह यांचाही समावेश होता. पण त्याला सरकारी यंत्रणांनी चाप लावला आहे.
मुंबई : अंमली पदार्थ सेवनप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून काही नावं समोर आली आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, सिमॉन खंबाटा, रकुल प्रीत सिंह, मुकेश छाब्रा यांच्या नावाचा समावेश आहे. अनेक मोठ्या वृत्तवाहिन्यांनी, वेबसाईट्सनी या बातम्या केल्या. पण सरकारी सूत्रांनी मात्र या सगळ्यावर पडदा टाकणारा दावा केला आहे. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीने आपल्या जबाबात कुणाचीही नावं घेतली नसल्याचं ते म्हणत आहेत.
रियाच्या जबाबातील सारा अली खान, रकुल प्रीत सिंहसह 25 बॉलिवूडमधील कलाकर NCB च्या रडारवर
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनापर्यंत आला आहे. रिया चक्रवर्तीला यासाठी अटकही झाली आहे. तिला अटक झाल्यानंतर तिने दिलेल्या जबाबात काही नावं बाहेर आल्याचं बोललं गेलं. पण त्याला सरकारी यंत्रणांनी चाप लावला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितलं, "एनसीबीने काहीही माहीती कुणाला सांगितलेली नाही. ती अत्यंत गोपनीय आहे. रियाने जबाबात सांगितलेली नावं, असं म्हणून प्रसिद्धी माध्यमांत ज्या बातम्या येत आहेत त्या निखालस चूक आहेत. अशी कोणतीही नावं यात नाहीत. रियाने कुणाचीच नावं आपल्या जबाबात घेतलेली नाहीत." या वक्तव्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे.
रिया चक्रवर्तीने कोणकोणत्या मोठ्या कलाकारांची नावं घेतली याचा बोभाटा खूप झाला. त्यानंतर अनेक तर्क-वितर्क नोंदवले गेले. रिया चक्रवर्ती सध्या अटकेत असून तिची चौकशी सुरु आहे. तिच्यासह तिचा भाऊ शोविक, दीपेश सावंत यांची ही चौकशी सध्या सुरु आहे.