Subodh Bhave : कधी काही चूक झाली तर त्याच्याकडे जातो अन्...; सुबोध भावे आणि बाप्पाचं नातं आहे खास
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) बाप्पासोबतचं त्याचं नातं शेअर केलं आहे.
Subodh Bhave On Kalavantancha Ganesh : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. बाप्पाबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला,"गणपती बाप्पाचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे. गेल्या 100 वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहे".
बाप्पाबद्दल एबीपी माझाशी बोलताना सुबोध भावे म्हणाला,"गणपती बाप्पा हा परमेश्वर आहेच. पण त्याहीपेक्षा बाप्पाचं आणि माझं मैत्रीचं नातं जास्त आहे. बाप्पासोबत आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. तसेच चांगलं काम होऊ दे म्हणून आशीर्वादही मागतो. कधी काही चूक झाली तर त्याच्यापाशी ती चूक मान्य करतो. आमच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा बाप्पा असतो.
सुबोध भावे पुढे म्हणाला,"गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहे. 100 वर्ष तरी झाली असावीत. बाप्पा माझ्या पाठीशी नाही असा एकही प्रसंग नाही. जेव्हा तुम्ही अडचणीत असता, अस्वस्थ होता, जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तेव्हा तुम्ही मनापासून बाप्पाचं नाव घेता आणि तुम्हाला मार्गही सापडतो".
सुबोध भावे रमला बाप्पाच्या आठवणीत...
बाप्पासोबतच्या आठवणी शेअर करताना सुबोध भावे म्हणाला,"लहानपणीचा गणेशोत्सव हा माझ्या आठवणीतला आहे. बाप्पाची आरास करायचो तो मांडीवर ठेऊन त्याचं विसर्जन करायचो किंवा मित्रांसोबत गणेशमंडळांना भेट देणं ही माझी आवडती गोष्ट होती. तिथे जाऊन आकर्षक रोषणाई, देखावे रात्रभर पाहण्यात एक वेगळीच गंमत होती. आता 10 वाजल्यानंतर पूर्वीसारखे देखावे बघता येत नाही. पूर्वी रात्रभर फिरत देखावे पाहण्यात जी गंमत होती ती आता दहा वाजताच संपते. गणेशोत्सवात पुण्यातील वेगवेगळ्या भागात रात्री गणपती पाहायला गेलेलं आठवतं".
गणेशोत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले असून सुबोध भावे बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"बाप्पाची आरास आणि स्वागतासाठीचं नियोजन सुरू झालं आहे. पण काय करायचं हे अद्याप ठरलेलं नाही".
View this post on Instagram
सुबोध भावे हा मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये तो काम करत आहे. 50 पेक्षा अधिक सिनेमांत त्याने काम केलं आहे. आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक बायोपिकमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला आहे.
संबंधित बातम्या