Nandini Gupta: वडील शेतकरी, वयाच्या 10 व्या वर्षी पाहिलं ब्युटी क्वीन होण्याचं स्वप्न; 'असा' आहे 'मिस इंडिया' नंदिनी गुप्ताचा प्रवास
राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षाच्या नंदिनी गुप्ताने (Nandini Gupta) एबीपी न्यूजसोबत संवाद साधला आहे. यावेळी नंदिनीनं तिच्या बालपणाबद्दल तसेच आई-वडिलांबद्दल सांगितलं.
Nandini Gupta: नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) ही मिस इंडिया 2023 या स्पर्धेची विजेती ठरली. या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि सेकंड रनर-अप ठरल्या. फेमिना मिस इंडिया 2023 चा खिताब जिंकल्यानंतर, राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षाच्या नंदिनी गुप्ताने एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी नंदिनीनं तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं.
नंदिनी ही मुंबईच्या लाला लजपत राय कॉलेजमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. नंदिनीने एबीपी न्यूजला सांगितले की, तिच्या आईने तिला ब्युटी क्वीन बनण्याचे स्वप्न दाखवले होते आणि तेव्हा नंदिनी 10 वर्षांची होती.
नंदिनीने सांगितले की, तिच्या आईला 'देवदास' हा चित्रपट आवडत होता. या चित्रपटातील ऐश्वर्या रायचे सौंदर्य पाहिल्यानंतर नंदिनीच्या आईने तिला ब्युटी क्वीन बनण्यासाठी प्रेरित केले. नंदिनीच्या आईनं तिला नेहमीच पाठिंबा दिला.
नंदिनीने सांगितले की, ती प्रियंका चोप्रापासून इन्स्पायर झाली. नंदिनी पुढे म्हणाली, "प्रियांका चोप्राच्या स्पष्ट बोलण्यानं, मी प्रेरित झाले. ज्या पद्धतीने तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, ते पाहून मला प्रेरणा मिळाली आहे."
उद्योगपती रतन टाटा यांनाही नंदिनी आपला आदर्श मानतात. नंदिनी सांगितले की, "मला बिझनेस वुमन होण्याची इच्छा आहे आणि मला लोकांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनवायचे आहे. त्यामुळेच सध्या मला बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे."
"बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास नक्कीच त्याचा विचार करेल", असंही नंदिनीनं सांगितलं. नंदिनीचे वडील कोटा येथील शेतकरी होते. ते स्वतः शेत नांगरायचे, शेती केल्यानंतर नंदिनीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली. त्यामुळे नंदिनीला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. नंदिनीने सांगितले की, 'मणिपूरमधील इम्फाळ येथे फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या फिनालेवेळी माझे आई-वडीलही उपस्थित होते.'
नंदिनीने सांगितले की, "माझ्या आईप्रमाणेच माझ्या वडिलांनीही मला नेहमीच पाठिंबा दिला आणि माझे कौतुक केले. माझे वडील कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. मिस इंडियाची विजेती म्हणून जेव्हा माझे घोषित झाले त्यानंतर वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या वडील इतके भावूक झालेले मी कधी पाहिले नव्हते.' नंदिनी लवकरच मिस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे."
इतर महत्वाच्या बातम्या: