Code Name Tiranga: परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ प्रेक्षकांच्या भेटीला! अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार चित्रपट
Code Name Tiranga: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि गायक हार्डी संधू यांचा चित्रपट ‘कोडनेम तिरंगा’ (Code Name Tiranga) हा आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
![Code Name Tiranga: परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ प्रेक्षकांच्या भेटीला! अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार चित्रपट Code Name Tiranga Parineeti Chopra and Harrdy Sandhu starrer will debut in theatres on October 14 Code Name Tiranga: परिणीती चोप्रा-हार्डी संधूचा ‘कोडनेम तिरंगा’ प्रेक्षकांच्या भेटीला! अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार चित्रपट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/14/7d37d931d0569643baac03e1200a5cd81665714593772373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Code Name Tiranga: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि गायक हार्डी संधू (Harrdy Sandhu) यांचा चित्रपट ‘कोडनेम तिरंगा’ (Code Name Tiranga) हा आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा पहिल्यांदाच जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांच्यासोबत शरद केळकर, रजत कपूर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती आणि दिशा मारीवाला यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.
‘कोडनेम: तिरंगा’ ही एका गुप्तहेराची कहाणी आहे, जो आपल्या राष्ट्रासाठी मोठ्या आणि कठीण मिशनवर आहे, जिथे त्याला आपल्या जीवाची पर्वा न करता लढावे लागणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा एका रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. परिणीतीने साकारलेले पात्र अनेक देशांचा प्रवास करून आपल्या देशाचं रक्षण करणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात गायक हार्डी संधू आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.
अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार चित्रपट!
आता प्रेक्षकांना हा चित्रपट अवघ्या 100 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. परिणीती आणि हार्डी संधूच्या या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे तो आता केवळ 100 रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘कोडनेम तिरंगा’ या चित्रपटाचे मुख्य कलाकार परिणीती चोप्रा आणि हार्डी संधू यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना त्यांचा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओमध्ये परिणीतीने सांगितले की, त्यांच्या या चित्रपटाच्या तिकिटांवर सूट दिली जात आहे, ज्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट केवळ 100 रुपयांमध्ये पाहू शकणार आहेत.
या चित्रपटाची तिकिटे केवळ रिलीजच्या पहिल्या दिवशीच 100 रुपयांना मिळतील, असे देखील त्यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटाच्या तिकिटांमध्ये सवलत दिली गेली होती. तीच ऑफर काही काळासाठी पुन्हा वाढवण्यात आली होती. याच अंतर्गत या चित्रपटाची तिकिटे 100 रुपयांमध्ये विकली जात आहेत.
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्ताने कमी करण्यात आले दर!
या वर्षी 23 सप्टेंबर रोजी मल्टीप्लेक्स असोसिएशनने ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा केला होता. यानिमित्ताने देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांच्या तिकीट दरात कपात करण्यात आली होती. या दिवशी चित्रपटांची तिकिटे केवळ 75 रुपयांना देण्यात आली होती, ज्याचा अनेक चित्रपटांना फायदा झाला आणि चांगली कमाई झाली. ही ऑफर अजूनही काही चित्रपटांसाठी सुरू आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)