Cannes 2024 : Cannes 2024 मध्ये भारताचा डंका, FTII विद्यार्थ्याच्या लघुपटाला मिळाला पुरस्कार
Cannes 2024: भारताने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतातील नावाजलेल्या इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने(FITT) दुसऱ्यांदा शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार जिंकला आहे.
Cannes 2024: फ्रान्समध्ये सध्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सव सुरू आहे. जगभरातील सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी या कान्स महोत्सवात हजेरी लावली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर भारतातून ऐश्वर्या राय, उर्वशी रौतेला, आदिती राव हैदरी यांच्यासह अनेक सौंदर्यवतींनी आपले सौंदर्य दाखवले. या चित्रपट महोत्सवात अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रीमियर देखील झाले आहेत. या सगळ्यात भारताने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतातील नावाजलेल्या इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटने(FITT) दुसऱ्यांदा शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार जिंकला आहे.
'सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन्स टू नो' लघुपटाने मारली बाजी
भारतीय दिग्दर्शक चिदानंद एस. नाईक यांच्या 'सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या लघुपटाने कान्स 2024 मध्ये बेस्ट शॉर्ट स्टोरीसाठी पुरस्कार जिंकला. याआधी 2020 मध्ये कॅटडॉग चित्रपटासाठी अश्मिता गुहा नियोगी यांना या श्रेणीत पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. 'ला सिनेफ' पुरस्काराची घोषणा 23 मे रोजी करण्यात आली.
View this post on Instagram
'सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन्स टू नो'ची 17 चित्रपटांसोबत स्पर्धा
एफटीआयआयचा विद्यार्थी असलेल्या चिदानंद एस. नाईकची शॉर्ट फिल्म 'सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन्स टू नो' ची इतर 17 चित्रपटांसोबत स्पर्धा होती. या श्रेणीत चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणाऱ्या 555 संस्थांमधून 2263 प्रवेशिका आलेल्या. त्यातून 18 चित्रपटांची निवड करण्यात आली. कान्समध्ये या श्रेणीतील पहिल्या पुरस्कारासाठी 15 हजार युरो, दुसऱ्या स्थानासाठी 11, 250 युरो आणि तिसऱ्या स्थानासाठी 7500 युरोचे बक्षीस होते.
'सनफ्लॉवर वेअर द फर्स्ट वन्स टू नो'ची कथा काय?
'इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'च्या (FTII) टेलिव्हिजन शाखेतील एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, चित्रपट निर्मात्याने या चित्रपटाची निर्मिती केली. हा कन्नड लोककथेपासून प्रेरित असलेला चित्रपट आहे. यात एक वृद्ध महिला कोंबडीची चोरी करते. तिच्या या कृत्यामुळे ते गाव अंधारात बुडते. 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' हा 16 मिनिटांचा लघुपट आहे.