Boyz 4: काय म्हणता ‘बॉईज 4’ही येणार? 'बॉईज 3'च्या जबदरस्त यशानंतर निर्मात्यांची घोषणा!
Boyz 4: 'बॉईज 3'च्या जबदरस्त यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे.
Boyz 4: विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज', 'बॉईज 2'ला जसा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, तितकेच प्रेम प्रेक्षकांनी 'बॉईज 3'लाही (Boyz 3) दिले. 'बॉईज 3' या नावाप्रमाणेच या चित्रपटामधील ढुंग्या, धैर्या आणि कबीरची धमाल यात तीन पटीने वाढली होती. बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमावणाऱ्या 'बॉईज 3'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सर्वत्र 'हाऊसफुल'चा बोर्ड मिरवणाऱ्या या चित्रपटाचे मॉर्निंग शोजही फुल्ल होते. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपट रिलीज झाल्यापासून सगळे शो हाऊसफुल झाले होते. काही ठिकाणी तर या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले होते. इतके यश मिळवल्यानंतर या चित्रपटाच्या टीमने नुकतीच सक्सेस पार्टी साजरी केली. या वेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळी, मित्रपरिवार, माध्यम प्रतिनिधी देखील या पार्टीत सामील झाले होते. याच पार्टीत ‘बॉईज 4’ची अधिकृत घोषणा करण्यात आली. याधीही या चित्रपटाचा चौथा भाग म्हणजे ‘बॉईज 4’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असे म्हटले जात होते.
कथानकाने केलं प्रेक्षकांच्या मनावर गारुड!
मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हजर असतात. याच कथेवर आधारित या चित्रपटात मैत्रीची एक नवी व्याख्या, एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील ही मैत्री प्रेक्षकांना देखील खूपच भावली. ‘मराठीचा माज बेळगावात नाही तर मग कुठे करायचा?, ‘तुम्हाला तुमच्या भाषेचा माज दाखवता येतो तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते’, असे दमदार संवाद असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
हे तर प्रेक्षकांचं प्रेम!
यावेळी चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले की, याचे श्रेय 'बॉईज 3'च्या संपूर्ण टीमला जाते. कारण, पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे धावपळ करणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. या यशात प्रेक्षकांचाही सहभाग मोठा आहे. कारण, त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो. 'बॉईज' आणि 'बॉईज 2' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, म्हणूनच आम्ही 'बॉईज 3' प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि आता लवकरच 'बॉईज 4' ही आपल्या भेटीला येणार आहे. यात ही धमाल चौपट होणार आहे.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रॉडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया आहेत. 'बॉईज 3' मध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संबंधित बातम्या