बॉलिवूड दिग्दर्शक संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या
दिग्दर्शक संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेतलं आहे. पोलिसांना त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटसुद्धा सापडली आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील दिग्दर्शक संतोष गुप्ता यांची मुलगी आणि पत्नीने मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये स्वतःला जाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी या प्रकरणात एडीआर नोंदवला आहे. संतोष गुप्ता आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेतलं आहे. पोलिसांना त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटसुद्धा सापडली आहे. पत्नी अस्मिताचा जागीच मृत्यू झाला. तर सृष्टी 70 टक्के भाजली होती, तिला ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. अस्मिताच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताची होती. त्यामुळे ते नेहमी नैराश्यात असायचे आणि याच कारणामुळेच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊन उचलल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
डीएन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मितावर उपचार सुरू होते मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती विकट होती. त्यांच्या मोबाईलमध्ये जी सुसाइड नोट सापडली आहे, त्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार न धरण्याच सांगितलं आहे. मात्र पोलिसांनी एडीआर दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
अस्मिता तिचे पती संतोष गुप्ता यांच्यापासून वेगळ्या का राहत होत्या. त्या दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अस्मिता आपल्या मुली सोबत राहत होत्या. आजारपणामुळे अस्मिता काही काम करू शकत नव्हती. माय-लेकी दोन्ही अंधेरीच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. सोमवारी त्यांनी जेव्हा स्वतःला पेटवून घेतले तेव्हा त्यांच्या घरातून धूर निघू लागला. ज्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलावलं.अग्निशमन दलाचे कर्मचारी आले आणि त्यांनी दरवाजा उघडला, त्यावेळी सगळा प्रकार समोर आला.
संतोष गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये काही स्मॉल बजेट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी फरार, रोमी द हिरो आणि आज की औरत यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.