Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण, लवकरच चित्रपटाची घोषणा
Balasaheb Thackeray Grandson Aishwarya Thackeray : आदित्य ठाकरेच्या माध्यमातून बाळासाहेबांचा नातू राजकारणात आला आहे. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान ठाकरे घराण्यातील एक चेहरा आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
Balasaheb Thackeray grandson Aishwarya Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात ठाकरे (Thackeray) या ब्रँडला प्रचंड महत्त्व आहे. प्रबोधनकारांपासून प्रज्वलित झालेली समाजकारणाची मशाल ही राजकारणापर्यंत येऊन पोहचली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजवले. बाळासाहेबांचे राजकारण हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुढे नेले. आता आदित्य ठाकरेच्या माध्यमातून बाळासाहेबांचा नातू राजकारणात आला आहे. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान ठाकरे घराण्यातील एक चेहरा आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार...
मुंबईतील मातोश्री बंगला हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी येथूनच आपल्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल चालवला. बाळासाहेब यांच्या पश्चात उद्धव ठाकरे हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. राज्याच्या राजकारणाच्या घडामोडींचे केंद्र असलेल्या मातोश्रीमध्ये एक ठाकरे असे आहेत, ज्यांना राजकारणात रस नाही. त्याला जाहीर सभांमध्ये भाषण करायचे नाही. पण, अधिराज्य गाजवायचे आहे ते राजकारणात नव्हे तर रुपेरी पडद्यावर. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
पाच वर्ष चित्रपटाच्या सेटवर...
ऐश्वर्याला राजकारणात रस नाही. ठाकरे कुटुंबात असूनही ऐश्वर्य सिनेसृष्टीत पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्यने जवळपास पाच वर्ष चित्रपटाच्या सेटवर घालवली आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्य ठाकरे आता लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. येत्या काही महिन्यात याबाबतची एक मोठी घोषणा होऊ शकते. काही मोठे निर्माते ऐश्वर्यसोबतच्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऐश्वर्य ठाकरेचे दणक्यात लाँचिंग करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
View this post on Instagram
ठाकरे कुटुंब सध्या महाराष्ट्रात सत्तेबाहेर आहे. पण ठाकरे कुटुंबाचा दबदबा कायम आहे. ऐश्ववर्यची आई स्मिता ठाकरे या स्वत: चित्रपट निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण, ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने थेट चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही चित्रपटांसाठी आपला आवाज दिला आहे. मात्र, अभिनयापासून लांब राहिले. त्यामुळे आता ऐश्वर्यबाबत ही मोठी घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.