Majha Katta : 'नागराज मंजुळेचे चित्रपट मला आवडतात'; 'माझा महाकट्ट्या' वर आयुष्मान खुरानानं चित्रपटांबाबत केली चर्चा
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात अभिनेता आयुष्यमान खुरानानं (Ayushmann Khurrana) हजेरी लावली.
Ayushmann Khurrana Majha Katta : नागराज मंजुळेचे (Nagraj Manjule) चित्रपट मला आवडतात, असं आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एबीपी माझाच्या महाकट्टा या कार्यक्रमामध्ये सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात अभिनेता आयुष्यमान खुरानानं हजेरी लावली.
आयुष्यमाननं महाकट्टा या कार्यक्रमात मनोरंजन क्षेत्रातील करिअरबाबत सांगितलं. तो म्हणाला, 'सध्याचा काळ हा आर्टिस्ट होणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. तुम्ही कोणत्याही शहरातून या, गावातून या किंवा तुमचं या कलाक्षेत्रात कोणीही नसेल तरी तुम्ही करिअर करु शकता. जर तुमच्यात टॅलेंट असेल तर ते टॅलेंट लपून राहात नाही. तुम्हाला संधी नक्कीच मिळेल. '
बालपणाबाबत आयुष्मान म्हणाला, 'माझं अशा काळात बालपण गेलं जेव्हा मुलं त्यांना अभिनेता व्हायचं आहे, हे मोकळेपणानं सांगू शकत नव्हते. आजकाल असं नाहीये, मुलांना वाटलं अभिनेता व्हावं तर ते मोकळेपणानं बोलतात. मी पाच वर्षाचा होतो जेव्हा मी अभिनेता व्हायचा विचार केला होता. शाळेत असताना मी अनेक नाटकांमध्ये काम केलं. '
आयुष्माननं त्याच्या नावाबद्दल देखील सांगितलं. तो म्हणाला, 'माझं नाव आधी निशांत ठेवण्यात आलं होतं. पण नंतर माझं नाव आयुष्मान ठेवण्यात आलं होतं. बालपणी सर्वात जास्त माझ्यावर वडिलांचा आणि आजीचा जास्त प्रभाव होता.'
पुढे आयुष्मान म्हणाला, 'मी आयएपीएल होस्ट केलं आहे, मी क्रिकेटपण खेळलो आहे, हे खूप कमी लोकांना माहित असेल. काही काळानंतर मुंबईमध्ये माझा बेस झाला होता. मी पत्रकार म्हणून अँकर म्हणून अनेकांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मी हा विचार केला की, माझा पहिला चित्रपट चांगला असावा. मी विकी डोनरच्या आधी सहा चित्रपटांना नकार दिला होता.'
मराठी चित्रपटांबाबत अयुष्मान म्हणाला, 'मी मराठी चित्रपट पाहतो. नागराज मंजुळेचे चित्रपट मला आवडतात. हे चित्रपट मातीशी जोडलेले असतात. आपल्या समाजावर ते चित्रपट भाष्य करतात. मला मराठी समजतं पण बोलता येत नाही.'
आयुष्मानचा ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या