Atpadi Nights Movie Review : वैवाहिक समग्र नाईट
आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचं महत्त्व फार उशिरा कळलं. अलिकडे लैंगिक शिक्षण दिलं जातं. निदान त्यावर बोललं जातं. पण याचं प्रमाण शहरात जास्त आहे. शहराकडून आपण जसे ग्रामीण भागाकडे जाऊ लागतो तसा त्या विषयााचा टॅबू तिकडे आहेच. म्हणजे, लैंगिक शिक्षण, वैवाहिक संबंध यांबद्दल आजही उघडपणे बोललं जात नाही. कारण ते विषय बोलायचे नसतात, असा अलिखित नियम या ग्रामीण भागांमध्ये असतो. याच टॅबूवर आटपाडी नाईट्स या सिनेमातून भाष्य केलं आहे.
आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचं महत्त्व फार उशिरा कळलं. अलिकडे लैंगिक शिक्षण दिलं जातं. निदान त्यावर बोललं जातं. पण याचं प्रमाण शहरात जास्त आहे. शहराकडून आपण जसे ग्रामीण भागाकडे जाऊ लागतो तसा त्या विषयााचा टॅबू तिकडे आहेच. म्हणजे, लैंगिक शिक्षण, वैवाहिक संबंध यांबद्दल आजही उघडपणे बोललं जात नाही. कारण ते विषय बोलायचे नसतात, असा अलिखित नियम या ग्रामीण भागांमध्ये असतो. याच टॅबूवर आटपाडी नाईट्स या सिनेमातून भाष्य केलं आहे. लोकांचे उगाचचे गैरसमज, त्यातून वेगवेगळ्या माध्यामातून आदळणारी माहीती, त्यावर अज्ञानापोटी व्यक्त होणारे आपण, असं सगळं या सिनेमात अत्यंत खुसखुशीतरित्या मांडलं आहे. याचा एकूण विषय पाहता खरंतर घराघरांत हा सिनेमा दाखवला गेला पाहिजे.
फार सोपा आणि साधा विषय आहे. आटपाडीजवळच्या एका गावात वसंत राहतो. आई वडील, मोठा भाऊ, वहिनी आणि लहान पुतण्या असं त्याचं कुटुंब. आता वसंतही लग्नाचा आहे पण काही केल्या त्याचं लग्न काही ठरेना. कारण वसंत कमालीचा बारीक आहे. त्याच्याकडे बघून म्हणजे त्याची शरीरयष्टी बघून त्याचं स्थळ नाकारलं जातं. आता त्याचं लग्न ठरत नाही याबद्दल गावातही चर्चा सुरू झाली आहे. आता नववी मुलगी पाहायची खेप आहे. वसंत नववी मुलगी पाहतो आणि त्याला ती आवडते. तिलाही तो आवडतो. दोघांच्या लग्नाची पत्रिका वाटायची वेळ येते आणि जो तो त्याला तब्येत सुधारण्याचा सल्ला देऊ लागतो. लग्नानंतर पत्नीसोबत नेमके कसे संबंध ठेवायचे असतात, वैवाहिक जीवन सुखी कसं करायचं असतं याची काहीही माहीती वसंताला नाही. त्याच्या मित्रांकडून त्याला जी माहीती दिली जाते ती असते सुवर्ण चूर्ण असलेल्या गोळ्यांची किंवा कोण्या बंगाली बाबाची. अखेर वसंताचं लग्न होतं. मित्रांची माहीती कामी येते. पण त्याचा उलटाच असर होतो. तो काय होतो.. त्याचा वसंतावर काय परिणाम होतो.. त्याच्या कुटुंबाची त्यावर काय प्रतिक्रिया असते या सगळ्याचा मिळून आटपाडी नाइट्स बनला आहे.
नितीन सुपेकर यांचा हा पहिला सिनेमा. पहिल्याच सिनेमात त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. पूर्वार्धात वसंत आणि त्याच्याशी संबंधित लोकांची मानसिकता त्याने उत्तम उभी केली आहे. त्यातले संवाद, स्थिती कमाल आहे. वसंताचं लाजणं.. लोकांच्या टोमण्यांना वैतागणं.. त्यानंतर त्याचं आणि पत्नीचं जुळलेलं नातं सुंदर टिपलं आहे. शिवाय त्याला त्याच्या मित्रांनीही साथ दिली आहे. सिनेमाचा टोन कमाल आहे. त्याची गडबड उत्तरार्धात झाली आहे. त्याचा अंदाज पूर्वार्धात येतो. म्हणजे, वसंता लग्नाच्या पत्रिका गावात वाटत जाताना प्रत्येक नागरिक त्याला 'काय रे जमेल ना' असंच विचारतो, तिथून सिनेमा जार सुटतोय की काय असं वाटू लागतं. त्यानंतर उत्तरार्धात सिनेमा वेगळं वळण घेतो. त्यातवेळीही वसंताच्या मानसिकतेचं स्थित्यंतर आणखी काही वेळ घेऊन करता आलं असतं तर अधिक गंमत आली असती. शिवाय, उलटून गेलेले सहा महिनेही मोंटाजमध्ये यायला हवे होते असं वाटून जातं.
अर्थात, सिनेमाचा विषय, त्याची मांडणी, उभी केलेली पार्श्वभूमी हे सगळं जमून आलं आहेच. यात उत्तरार्ध अधिक कसून बांधता आला असता तर धमाल होती. अर्थात सिनेमा मनोरंजन करतो. पण आजच्या काळात या सिनेमाचं येणं जास्त महत्वाचं आहे. नानाविध जाहिरातींना बळी पडणारी तरूणाई.. इंटरनेटचं आक्रमण आदी गोष्टी यात उत्तम दाखवल्या आहेत. खरंतर लैंगिक शिक्षणासारख्या विषयाबाबत बाळगला जाणारा संकोच, कुटुंबात अपत्यप्राप्तीबाबत होणारी सक्ती आदी अनेक पदर या सिनेमाला आहेत. अर्थात हे सगळं हसत खेळत असल्यामुळे मजा येते. याला चार चांद लावलेत ते संजय कुलकर्णी, छाया कदम, आरती वडगबाळकर, समीर खांडेकर यांनी. संजय यांचा वावर सहज आणि सुरेख आहे. वसंताला मुलगी दाखवणं.. त्याला दरडावणं.. सुनेच्या पाठिशी उभं राहणं आणि शेवटी पत्नीने काही गोष्टी सांगितल्यावरच आलेलं भान हे सर्वच पदर उल्लेखनीय आहेत. सर्वांनीच नेटकं कुटुंब उभ केलं आहे. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळत आहेत तीन स्टार्स. हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे. जरूर पहा.