अरुंधती गंभीर अपघातानंतर व्हेंटिलेटरवरच; चाहत्यांना विनंती,"उपचारासाठी पैशांची मदत करा अन् देवाकडे प्रार्थनाही"
Arundhathi On Ventilator : लोकप्रिय अभिनेत्री अरुंधती गंभीर अपघातानंतर व्हेंटिलेटरवर असून बहिणीने चाहत्यांना देवाकडे प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
Arundhathi Nair on Ventilator : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अरुंधती नायर (Arundhathi Nair) गंभीर अपघातामुळे सध्या चर्चेत आहे. अपघातानंतर अरुंधती व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज सुरू आहे. 14 मार्च 2024 रोजी तिचा अपघात झाला होता. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीच्या बहिणीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना गंभीर अपघाताबाबत माहिती दिली होती. आता पुन्हा बहिणीने चाहत्यांना अरुंधतीसाठी देवाकडे प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
अरुंधतीच्या बहिणीची पोस्ट काय? (Arundhathi Nair Sister Post)
अरुंधती नायरची बहिण अरथीने (Aaraty Nair) चाहत्यांना गंभीर अपघातासंदर्भात माहिती दिली आहे. अरथीने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"तामिळनाडूतील वर्तमानपत्रांत आणि वृत्त वाहिन्यांमध्ये येत असलेल्या बातम्यांवर मला स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. माझ्या बहिणीची तीन दिवसांपूर्वी गंभीर अपघात झाला असून तिरुंवनंतपुरम येथील अनंतपुरी रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे".
View this post on Instagram
अरुंधतीची प्रकृती खूपच चिंताजनक आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या बहिणीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. अरुंधतीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करा, असं भावनिक आवाहन तिच्या बहिणीने चाहत्यांना केलं आहे.
अरुंधतीचं फिल्मी करिअर (Arundhathi Nair Movies)
अभिनेत्री अरुंधती नायरच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2014 मध्ये 'पोंगी एझु मनोहरा' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून झाली आहे. तामिळ सिनेमानंतर तिने 2018 मध्ये 'ओट्टाकोरु कामुकन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मल्याळम सिनेमांत पदार्पण केलं. 2019-20 या काळात मल्याळम इंडस्ट्रीतील छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं. अरुंधती 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'आयिरम पोरकासुकल' या सिनेमात शेवटची झळकली आहे. विजय एंथनीच्या 2018 मध्ये आलेल्या 'शैतान' (Shaithan) या सिनेमाने अरुंधतीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अरुंधीतच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि रुपेरी पडद्यावर झळकावी, अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.
उपचारासाठी चाहत्यांकडे मागितली पैशांची मदत
अरुंधतीच्या उपचारासाठी तिची खास मैत्रीण आणि अभिनेत्री गोपिका अनिलने (Gopika Anil) चाहत्यांकडे पैशांची मदत मागितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गोपिकाने लिहिलं आहे,"माझी मैत्रीण अरंधती नायरचा गंभीर अपघात झाला असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारासाठी आम्हाला आर्थिक मदत करावी, ही विनंती. खूप खूप धन्यवाद". अरुंधतीच्या अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या