अनुष्का शर्मा 7 वर्षांनंतर करणार कमबॅक? ‘चकदा एक्स्प्रेस’ची Netflix सोबत अडकलेली बोलणी सुटणार?
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ICC महिला वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर या चित्रपटाबद्दलची चर्चा पुन्हा जोर पकडत आहे.

Bollywood : अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. अनुष्काचा लीड अॅक्ट्रेस म्हणून शेवटचा चित्रपट ‘झिरो’ 2018 मध्ये प्रदर्शित झालेला. या चित्रपटानंतर तिने क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘चकदा एक्सप्रेस’ची शूटिंग पूर्ण केली होती. मात्र, हा चित्रपट गेली तीन वर्षे नेटफ्लिक्सकडे ‘होल्ड’वर असल्याने प्रदर्शित झालाच नाही. (Chakda Express)
माजी भारतीय क्रिकेटपटू झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकला नेटफ्लिक्स आणि निर्माती कंपनी क्लीन स्लेट फिल्म्ज यांच्यातील मतभेदांमुळे बराच काळ थांबवण्यात आले होते. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ICC महिला वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर या चित्रपटाबद्दलची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून इतिहास रचला.
‘चकदा एक्सप्रेस’च्या रिलीजबाबत हालचाल?
मिड-डेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अलीकडच्या वनडे वर्ल्ड कप विजयामुळे या बायोपिककडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे. चित्रपटाचे निर्माते आता रिलीजबाबत उत्साहित असून नेटफ्लिक्स इंडिया यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकृतरित्या पत्र लिहून चित्रपट रिलीज करण्याची विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “ नेटफ्लिक्स इंडियाच्या टॉप अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी वाद बाजूला ठेवून हा चित्रपट रिलीज करावा. झूलन दीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूवर बनलेला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचायलाच हवा.” असे सांगण्यात येत आहे.
नेटफ्लिक्स-प्रोडक्शन हाउस वादामुळे अडला चित्रपट
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाची रिलीज अडकण्याचे कारण नेटफ्लिक्सला चित्रपटाचे अंतिम स्वरूप पसंत न पडणे होते. तसेच प्रोडक्शन हाउस क्लीन स्लेट फिल्म्सचे बजेट ओलांडल्यावरून वाद होते.त्यामुळे प्रोजेक्टचा स्केल, गुणवत्ता आणि खर्च यावरून मतभेद झाले. तरीही चित्रपटाच्या कंटेंटबाबत सूत्रांचा दावा आहे की ‘फिल्म मजबूत आहे’.दुसऱ्या सूत्राने सांगितले की, “टीमने पुन्हा चर्चेला सुरुवात केली आहे आणि याच महिन्यात रिलीजबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.”
अनुष्काचा मागील कामाचा आढावा
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’मध्ये अनुष्काने आफिया यूसुफझाई भिंदरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.त्याशिवाय, 2020 मध्ये तिने ‘बुलबुल’ हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. 2022 मध्ये आलेल्या ‘कला’मध्ये ती कॅमियो रोलमध्ये झळकली होती.आता ‘चकदा एक्सप्रेस’ प्रदर्शित होऊन अनुष्काचा सात वर्षांनंतरचा कमबॅक खरोखरच साकार होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'चकदा एक्सप्रेस' ही फिल्म भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा झूलन देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.























