Allu Arjun: घरावर झालेल्या दगडफेकीनंतर अल्लू अर्जुनने मुलांसह सोडलं घर, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर त्याने मुलांसह त्याचं घर सोडलं आहे.
Allu Arjun : पुष्पा 2 (Pushpa 2) फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) मागील काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. रविवार 22 जानेवारी रोजी काही अज्ञातांनी अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेकही केली. खरं तर, संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, न्यायाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी हैदराबादमधील अल्लू अर्जुनच्या घरी गोंधळ घातला.स्मानिया युनिव्हर्सिटी जॉइंट ॲक्शन कमिटी (OU-JAC) चे सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक केल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मुलांसह सध्या त्याचं राहतं घर सोडलं आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये अल्लू अर्जुन त्याची मुलं अल्लू अरहा आणि अल्लू अयानसोबत घराबाहेर पडताना दिसतोय. यावेळी मीडियाने कारला घेरले तेव्हा आत बसलेली अभिनेत्याची मुलगी अरहा खूप अस्वस्थ दिसली. या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मुलांना त्यांच्या आजोबांच्या घरी सोडलं असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. तसचे या हल्ल्यतील सहा जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे.
अल्लू अर्जुनच्या वडिलांनी केला घटनेचा निषेध
या घटनेनंतर अल्लू अर्जुनने काही भाष्य केललं नाहीये. मात्र त्याचे वडील अल्लू अरविंद यांनी रविवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला आणि अशा घटनांना प्रोत्साहन देऊ नये, असे सांगितले. अल्लू अर्जुनच्या घरी पत्रकारांशी बोलताना अभिनेत्याचे वडील अल्लू अरविंद म्हणाले, “आज आमच्या घरी काय झाले ते सर्वांनी पाहिले आहे. पण आता वेळ आली आहे की आपण त्यानुसार वागू. सध्या आपल्यासाठी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची योग्य वेळ नाही.
पुढे त्यांनी म्हटलं की, पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशा घटनांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये. पण केवळ मीडिया इथे आहे म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही. आता संयम बाळगण्याची वेळ आली आहे.
पोलिसांनी 6 जणांना केली अटक
दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपी पश्चिम विभाग, हैदराबाद यांनी सांगितले की, आरोपींवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही घटना संध्याकाळी 4:45 च्या सुमारास घडली, जेव्हा काही लोकांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर घोषणाबाजीला सुरुवात केली.
आंदोलकांपैकी एकाने आवारात चढून टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि रॅम्पवर लावलेल्या काही फुलांच्या भांड्यांचे नुकसान केले. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तुटलेली भांडी, तुटलेली काच आणि नुकसान झालेली झाडे दिसली, दगडफेकीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Allu Arjun’s kids (Arha & Ayaan) whisked away from the house after attacks today! pic.twitter.com/iu5N5UFZ3Q
— idlebrain.com (@idlebraindotcom) December 22, 2024