Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज तंजावरमध्ये प्रारंभ; 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर'
Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज तंजावरमध्ये प्रारंभ होणार आहे.
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज तंजावरमध्ये प्रारंभ होणार आहे. 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची महाराष्ट्रातील रंगकर्मी आतुरतेने वाट पाहत आहेत. 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' होणार आहे.
नाट्य संमेलनाचा आज तंजावरमध्ये प्रारंभ
पिंपरी चिंचवड येथे 5,6 आणि 7 जानेवारी 2024 या काळात संपन्न होणाऱ्या 100 व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून होणार आहे. तंजावर (तामिळनाडू) येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण 22 मराठी नाटके लिहिली असून, 'लक्ष्मी नारायण कल्याण' हे पहिले मराठी नाटक मानले जाते. या नाटकात 'लक्ष्मी नारायण' यांच्या लग्नाची गोष्ट चित्रीत केलेली आहे.
नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करून शंभराव्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ आज (27 ऑक्टोबर 2023) केला जाणार आहे. शंभराव्या नाट्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल हे असून हा नाट्य ग्रंथ वंदन सोहळा 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.
सांगलीत रोवणार नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ
सांगलीत 29 डिसेंबर 2023 रोजी 'सं. सीता स्वयंवर' कार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शाखेकडे नटराज व नाट्य वाङमय सुपूर्द करण्यात येणार आहे. 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व कार्यक्रमांना रसिकांनी व नाट्यकर्मींनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.
100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त महाराष्ट्रभर 'नाट्यकलेचा जागर' कार्यक्रम
'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध 22 केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई येथे होणार आहे. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे.
संबंधित बातम्या