एक्स्प्लोर
अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून बाईकस्वाराचा मृत्यू
20 वर्षीय बाईकस्वाराने हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळे दुभाजकावर आदळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मुंबई : अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून गोव्यात बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. बाईकस्वाराची हलगर्जीच त्याच्या जीवावर बेतल्याची चर्चा आहे. अपघातात झरीनही जखमी झाली आहे. गोव्यातील अंजुना भागात झरीनची कार यूटर्न घेत होती, त्यावेळी संबंधित बाईक कारवर आदळली. 20 वर्षीय बाईकस्वार नीतेशने हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळे दुभाजकावर आदळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्याचा मृत्यू झाला. यामध्ये झरीन खानलाही दुखापत झाल्याची माहिती आहे. ही घटना काल संध्याकाळी गोव्यात घडली. पोलिसांनी झरीनच्या कारचा ड्रायव्हर अब्बास अलीला अटक केली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. आठवड्याभरापूर्वीच झरीन खानने तिच्या माजी मॅनेजरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अंजलीने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप झरीनने केला होता. झरीनने सलमान खानसोबत 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर रेडी, हाऊसफुल 2, हेट स्टोरी 3 यासारख्या चित्रपटातून काम केलं.
आणखी वाचा























