रेल्वे स्टेशनवर मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला
मुजफ्फरपूरमधील या व्हिडीओमध्ये एक चिमुकला आपल्या आईच्या मृतदेहावरील चादर ओढून तिला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. या दृश्यांनी अनेकांचं मन हेलावलं. यानंतर अभिनेता शाहरुख खानने या चिमुकल्याला मदतीचा हात दिला आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी बिहारमधील मुजफ्फरपूर रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला आपल्या आईच्या मृतदेहावरील चादर ओढून तिला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. या दृश्यांनी अनेकांचं मन हेलावलं तर स्थलांतरित मजुरांच्या अडचणीही समोर आल्या. या व्हिडीओनंतर अभिनेता शाहरुख खान या मुलाच्या मदतीला सरसावला आहे. शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनने या मुलाच्या मदतीची आणि आर्थिक सहाय्याची तयारी दर्शवली आहे. या मुलाचं संगोपन आता त्याचे आजी-आजोबा करणार आहेत.
मीर फाऊंडेशनने ट्विटर लिहिलं आहे की, "या मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मीर फाऊंडेशन आभार मानते. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडीओत हा मुलगा आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता आम्ही त्याची मदत करत आहोत आणि तो त्याच्या आजी-आजोबांच्या देखरेखीत राहिल.
Thank you all for getting us in touch with the little one. We all pray he finds strength to deal with the most unfortunate loss of a parent. I know how it feels...Our love and support is with you baby. https://t.co/2Z8aHXzRjb
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 1, 2020
मुजफ्फरपूरमधल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला आपल्या मृत आईच्या देहावरील चादर ओढून तिला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अरविना खातून नावाची 35 वर्षीय महिला प्लॅटफॉर्मवर मृतावस्थेत दिसत आहे. तसंच दोन बॅगाही तिच्या शेजारी ठेवलेल्या आहेत. ही महिला आणि तिची दोन मुलं श्रमिक स्पेशल ट्रेनमधून 25 मे रोजी अहमदाबादहून परतले होते.
शाहरुख खान अशाप्रकारच्या कठीण प्रसंगात कायमच गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो. काही दिवसांपूर्वीच कोलकातामध्ये अम्फान चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं होतं. यानंतर शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल क्रिकेट संघासह लोकांच्या मदतीसाठी पुढे आला होता.
तर त्याआधी शाहरुखने मुंबईतील आपल्या कार्यालयाची इमारत क्वॉरन्टाईन सेंटरसाठी बीएमसीला वापरण्यासाठी दिलं होतं. याशिवा. महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 25 हजार पीपीई किट्स पुरवले होते.