(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Sabarmati Report: '12 वी फेल' नंतर आता विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाची रिलीज डेट जाहीर!
'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) हा चित्रपट 2002 मध्ये गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित असणार आहे.
The Sabarmati Report: 12वी फेल (12th Fail) या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हा चर्चेत आहे. 12वी फेल या चित्रपटातील विक्रांतच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता 12वी फेल चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विक्रांत मेस्सी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा अभिनेता एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) नावाच्या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात काम करणार आहे. नुकतीच विक्रांतनं एक पोस्ट शेअर करुन त्याच्या या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
विक्रांतनं शेअर केली पोस्ट
विक्रांतनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक वर्तमानपत्र दिसत आहे. या वर्तमानपत्रावर 'द साबरमती रिपोर्ट' असं लिहिलेलं आहे. या व्हिडीओला विक्रांतनं कॅप्शन दिलं, "एका अनोळखी कथेसह इतिहास उलगडण्यासाठी सज्ज व्हा, द साबरमती रिपोर्ट - 2002 च्या घटनेचा एक प्रवास ज्याने संपूर्ण देशावर कधी न मिटणारी छाप सोडली!"
कधी रिलीज होणार 'द साबरमती रिपोर्ट'?
'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक रंजन चंदेल यांनी केले आहे. या चित्रपटात विक्रांतसोबतच राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा या देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
सत्य घटनेवर आधारित असणार चित्रपट
'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 'द साबरमती रिपोर्ट' 27 फेब्रुवारी 2002 रोजी भारताच्या गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित आहे.
View this post on Instagram
विक्रांतच्या '12वी फेल' ला मिळाली प्रेक्षकांची पसंती
विक्रांतच्या 12 वी फेल या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात विक्रांतसोबत मेधा शंकर, अंशुमन पुष्कर यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला आहे. आता विक्रांतच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: