(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुशांतला हवी होती 'यशराज', 'धर्मा'ची मान्यता, दिग्दर्शक अनुराग कश्यपचा गौप्यस्फोट
अनुरागने सुशांतला दोन सिनेमे देऊ केले होते. पण बड्या बॅनरमध्ये काम करण्याच्या इच्छेपोटी त्याने ते दोन्ही सिनेमे सोडले असा गौप्यस्फोट त्याने एका मुलाखतीत केला आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीय. अनेक कलाकार त्याच्या आत्महत्येचं आपआपल्या परिने विश्लेषण करताहेत. त्याची मानसिकता, त्याचं वर्तन यावर खल होतो आहे. अशातच आता दिग्दर्शक अनुराग कश्यपही उतरला आहे. अनुरागने सुशांतला दोन सिनेमे देऊ केले होते. पण बड्या बॅनरमध्ये काम करण्याच्या इच्छेपोटी त्याने ते दोन्ही सिनेमे सोडले असा गौप्यस्फोट त्याने एका मुलाखतीत केला आहे.
अनुरागने एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, आपण बड्या बॅनरसोबत असावं. त्यांच्या सानिध्यात यावं. आपल्या अभिनयाला त्यांची मान्यता असावी, असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने यशराज, धर्मा यांचे सिनेमे स्वीकारले. मी त्यावेळी हसी तो फसीं करत होतो. पण तोवर त्याला परिणिती चोप्राच्या सोबतचा सुद्ध देसी रोमान्स हवा होता. त्यांनी त्यासाठी यशराजसोबत करार केला. त्यामुळे मी त्याला घेऊ शकलो नाही. खरंतर मला या सिनेमासाठी उत्तर प्रदेशातल्या मुलाची गरज होती. तसं मी कास्टिंग डिलेक्टर मुकेश छाब्राला सांगितलं. त्याने मला सुशांतचं नाव सुचवलं. त्यानंतर त्याला मुकेशने विचारलंही. पण त्याने यशराजची फिल्म करण्याचा निर्णय घेतला', असं अनुराग म्हणतो.
दुसऱ्यावेळी मुक्काबाज या चित्रपटात मला त्याला घ्यायचं होतं. म्हणून मी त्याला पुन्हा विचारलं. पण त्यावेळी त्याला पुन्हा मोठ्या बॅनरसोबत काम करायचं होतं. त्यावेळी त्याने ड्राईव्ह स्वीकारला. कारण हा सिनेमा धर्मा प्रॉडक्शनचा होता. दरम्यान त्याने केलेला एम.एस धोनी हिट झाला. लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. या सिनेमानंतर तरी बडे बॅनर आपल्याला बोलावतील असं त्याला वाटलं होतं. पण त्यानंतर कोणत्याही मोठ्या बॅनरने त्याला बोलावलं नाही. म्हणून धर्माकडे काम करण्याचा त्याचा आग्रह होता. धोनीनंतर त्याने ड्राईव्ह केला. कारण धर्मासोबत काम करायची त्याची इच्छा होती, ' असंही अनुरागने आपल्या मुलाखतीत सांगितलं.
अनुरागचं हे वक्तव्य अत्यंत महत्वाचं मानलं जाणार आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीकडे जेव्हा यशराजसोबत करार करण्याचा पर्याय होता तेव्हा त्यांच्यासोबत करार करू नये अशी भूमिका सुशांतने घेतली होती असं रिया म्हणाली. कंगनानेही आपल्या मुलाखतीत ते सांगितलं आहे. अशावेळी अनुराग मात्र सुशांतला बड्या बॅनरसोबत काम करायचं होतं असं सांगतो आहे. यावरून ज्या मुलाला आधी यशराजमध्ये काम करायचं होतं तोच पुढे आपल्या मैत्रीणाला त्यांच्यासोबत करार करू नको असं का सांगत असेल असाही प्रश्न निर्माण होतो. अनुरागच्या वक्तव्यानंतर अशी चर्चा सिनेवर्तुळात आहे.
संबंधित बातम्या
- आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट
- काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल
- Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; 'एवेंजर्स एंडगेम'लाही टाकलं मागे
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?