पाहा लगीनघाईत रमली श्रद्धा कपूर; Photo आणि Video व्हायरल
मागील काही काळापासून सर्वत्र लगीनघाईचे वारेही पाहायला मिळत आहे. कोरोना नियमांचं पालन करत पार पडणाऱ्या या लग्नसराईपासून अगदी सेलिब्रिटी मंडळीही मागे राहिलेली नाहीत.
मुंबई : मागील काही काळापासून सर्वत्र लगीनघाईचे वारे पाहायला मिळत आहे. कोरोना नियमांचं पालन करत पार पडणाऱ्या या लग्नसराईपासून अगदी सेलिब्रिटी मंडळीही मागे राहिलेली नाहीत. गेल्या साधारण वर्षभरात अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी लग्नगाठ बांधल्याचं पाहायला मिळालं. असंच चित्र सध्या अभिनेत्री (Shraddha Kapoor) श्रद्धा कपूर हिच्या कुटुंबात पाहायला मिळत आहे. लग्नसराईत रमलेल्या श्रद्धानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही याची झलक चाहत्यांच्या भेटीला आणली आहे.
आता तुम्ही म्हणाल, श्रद्धाच लग्न करतेय की काय? तर, तसं नाहीय. श्रद्धा तिचा मावस भाऊ, प्रियांक शर्मा याच्या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं सध्या मालदीवमध्ये गेली आहे. इथं ती लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षणाचा अगदी मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. काही विधींमध्ये श्रद्धाही तिची मावशी पद्मिनी कोल्हापुरेसोबत सहभागी होताना दिसत आहे.
पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा या चित्रपट निर्माते करिम मोरानी यांच्या मुलीशी म्हणजेच शाजा मोरानी हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. मालदीवमध्ये या दोघांचीही कुटुंब सध्या या खास विवाहसोहळ्यासाठी दाखल झाली आहेत.
सहसा एखाद्या लग्नघरात दिसणारं वातावरण आणि उत्साह असंच काहीसं चित्र सध्या मालदीवमध्ये दाखल झालेल्या या कुटुंबीयांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रियांकच्या विवाहसोहळ्यातील अनेक विधींसाठी श्रद्धाचा थाटही पाहण्याजोगा आहे. यामध्ये तिची स्टाईल स्टेटमेंट अनेकांचीच मनं जिंकत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, प्रियांक आणि शाजा यांनी मागील महिन्यामध्ये कोर्ट मॅरेज करत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली होती. ज्यानंतर आता या सेलिब्रिटी जोडीनं थेट मालदीवमध्ये धमाकेदार लग्नसोहळ्याचं आयोजन केल्याचं कळत आहे. इथं आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे श्रद्धाचा कथित प्रियकर रोहन श्रेष्ठा हासुद्धा या विवाहसोहळ्यासाठी पोहोचला आहे, त्यामुळं आता या दोघांवरही पाहुण्यामंडळींच्या नजरा खिळल्या आहेत.