Bhau Kadam : शरद पवारांनीही नाटकात काम केलं होतं, अजित पवारांचे स्टार प्रचारक भाऊ कदमने सांगितला 'तो' किस्सा
Bhau Kadam : भाऊ कदमने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांच्या नाटकाचा किस्सा सांगितला आहे.
Bhau Kadam : महाराष्ट्राचा विनोदवीर म्हणून ओळखला जाणारा प्रेक्षकांचा लाडका कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam) आता अजित पवार गटाचा (Ajit Pawar Group) स्टार प्रचारक झाला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Elections) भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्टार प्रचारक असणार आहे. सुरुवातीला सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी घेतली त्यानंतर आता आणखी एक सुपरस्टार ही जबाबदारी पार पडणार आहे. पण असं असलं तरीही एबीपी माझासोबत बोलताना भाऊ कदमने शरद पवारांना (Sharad Pawar) भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे शरद पवारांनी काम केलेल्या नाटकाचाही किस्सा त्याने सांगितला.
स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचीच निवड का? अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? असे अनेक प्रश्न यावेळी भाऊ कदमला विचारण्यात आले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाऊ कदमने या सगळ्या प्रश्नांवर भाष्यही केलं आहे. त्याचप्रमाणे शरद पवार आणि त्यांचं नाटक प्रेम याविषयीची एक रंजक किस्साही भाऊने यावेळी एबीपी माझाला सांगितला.
शरद पवारांनी केलं होतं नाटकात काम
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांची कधी भेट झाली का, असा प्रश्न भाऊ कदमला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने म्हटलं की, नाही आमची कधी भेट झाली नाही.. फक्त बारामतीमध्ये आमच्या करुन गेलो गाव या नाटकाचा प्रयोग होता. तो अजितदादांनी पाहिला..पण साहेबांची भेट नाही झाली. त्यांना भेटण्याची इच्छा खूप आहे कारण त्यांनाही नाटकाची खूप आवड आहे हे मला माहितेय.. कारण त्या नाट्यगृहात शरद पवारांनी नाटकात काम केलेला फोटो लावण्यात आलाय. तो फोटो मलाही दाखवण्यात आला. शरद पवारांनी होय तेव्हा नाटकात काम केलं होतं, तो फोटो तिथे आहे.
'शरद पवार-अजित पवार एकत्र यायला हवेत'
भाऊ पुढे म्हणाला की, पवार कुटुंबात काय झालं माहिती नाही, मात्र मला वाटतं शरद पवार अजित पवार एकत्र यायला हवेत. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, असं वाटतं. एकच वादा अजित दादा. गद्दारीबाबत बोलणार नाही. त्यातील नेमकी माहिती मला नाही. शरद पवारांची माझी बारामतीत एका नाटकाच्या प्रयोगा दरम्यान भेट झाली. त्यावेळी शरद पवारांनी एका नाटकात काम केलं होतं, तो फोटो मला त्यांनी दाखवला, अशी आठवण भाऊ कदमने सांगितली.