Lata Mangeshkar : लता दीदींच्या प्रकृतीसाठी रिक्षावाल्याचा देवाकडे धावा
Lata Mangeshkar Health Update : मुंबईच्या एका रिक्षा चालकाने देखील लता दीदींच्या प्रकृती स्वास्थ्यसाठी प्रार्थना केली आहे.
Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच असून आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. वृद्धापकाळामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागेल' असं डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांच्यासाठी जगभरातील त्यांचे चाहते प्रार्थना करीत आहेत. मुंबईच्या एका रिक्षा चालकाने देखील आपल्या पद्धतीने लता दीदींच्या प्रकृती स्वास्थ्यसाठी प्रार्थना केली आहे.
सत्यवान गीते या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षा वर लता दीदींचे पोस्टर लावून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. रिक्षाच्या आत बाहेर त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहे.तसेच त्यांचीच गाणी रिक्षात लावून त्यांच्या गाण्याना उजाळा देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.ही रिक्षा पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील होत आहे.या रिक्षा वरील हे पोस्टर आणि प्रार्थना पाहून प्रवासी देखील लता दीदींसाठी प्रार्थना करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी उषा मंगेशकर यांनी देखील लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. दीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्या लोकांसोबत बोलू शकतात. पण डॉक्टरांनी त्यांना लोकांबरोबर बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे, असं उषा मंगेशकर यांनी सांगितले होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
संबंधित बातम्या