Chhatrapati Shivaji Maharaj : 'कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल, महाराजांचा पुतळा नाही'; मराठी लेखकाचा तीव्र शब्दांत संताप
Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेक स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळतंय.
Chhatrapati Shivaji Maharaj : सोमवार 26 ऑगस्टचा दिवस महाराष्ट्रासाठी सगळ्यात धक्कादायक ठरला. काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) 35 फुट पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं. पण या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उमटू लागले. यावर कलाविश्वातूनही प्रतिक्रिया येत आहे.
अभिनेता रितेश देशमुख याने काही मोजक्याच शब्दांत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता मराठी लेखक अरविंद जगताप यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. तीव्र अशा शब्दांत अरविंद जगताप यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकच नव्हे तर त्यांनी सरकारवरही रोष व्यक्त केला आहे.
अरविंद जगताप यांचा सरकारवर रोष
अरविंद जगताप यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं की, 'कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल, महाराजांचा पुतळा नाही. प्रायश्चित्त वगैरे काही मानत असाल तर जगातलं सगळ्यात मोठं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हावं आणि तिथे पन्नास किलोमीटरपर्यंत कुठल्याही पक्षाच्या राजकारण्याचं चुकूनही नाव नसावं.'
किरण माने यांनीही व्यक्त केला संताप
किरण माने यांनीही पोस्ट करत म्हटलं की, तुम्हीच सांगा, आता तरी आम्ही तुमचा राजीनामा मागायचा का? तेवढं वजन आहे का या घटनेचं? तुम्हीच सांगा आंदोलन किंवा बंद करू का आम्ही? की हलक्यात घेऊन गप्प बसू? नक्की संतापजनक घटना आहे का ही? तुम्हीच सांगा. नाहीतर परत तुम्ही कुत्सितपणे हसुन म्हणायचा, "गाडीखाली कुत्रं आलं तरी राजीनामा मागतील हे."
रितेश देशमुखने तीनच शब्दांत केल्या भावना व्यक्त
दरम्यान अभिनेता रितेश देशमुख यानेही एक्स पोस्ट करत या घटनेसंदर्भात त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रितेशने म्हटलं की, राजे माफ करा. या सगळ्यानंतर राजकीय वर्तुळातलं वातावरणही चांगलच तापलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण अवघ्या काही महिन्यांतच हा पुतळा कोसळला. त्यामुळे विरोधकांकडून टीकेचा सूरही गडद होऊ लागला. त्यातच आता कलाविश्वासह जनसामन्यांमध्येही तीव्र भावना उमटत असल्याचं पाहायला मिळतंय.