Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान
Cannes Film Festival 2022: राजस्थानी गायक मामे खान (Mame Khan) यांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांची जादू दाखवली आहे. अशा प्रकार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे ते पहिलेच लोककलाकार ठरले आहेत.
Cannes Film Festival 2022: जगातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जाणारा ‘कान्स चित्रपट महोत्सव 2022’ (Cannes Film Festival 2022) नुकताच सुरू झाला आहे. या सोहळ्याशी संबंधित अनेक फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. परदेशी सेलिब्रिटींसोबतच भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटीही यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. यंदाचा ‘कान्स’ महोत्सव भारतासाठी खूप खास आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा यंदा ‘कान्स ज्युरी सदस्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. दीपिकासह अनेक बॉलिवूड कलाकार देखील या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. मात्र, या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच एक भारतीय लोककलाकार देखील अवतरला आहे.
राजस्थानी गायक मामे खान (Mame Khan) यांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांची जादू दाखवली आहे. अशा प्रकार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे ते पहिलेच लोककलाकार ठरले आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊन त्यांनी एक नाव इतिहास रचला आहे.
लूकचीही चर्चा!
मामे खान यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपली देसी स्टाईल दाखवली. रेड कार्पेटवर चालताना त्यांनी पारंपरिक राजस्थानी पोशाख परिधान केला होता. त्यांनी रंगीबेरंगी नक्षीदार कोट आणि गुलाबी कुर्ता परिधान केला होता. डोक्यावर खास राजस्थानी पगडी घालून त्यांनी आपला लूक पूर्ण केला. त्यांच्या या देसी अवताराची देखील कान्समध्ये चर्चा आहे.
कोण आहेत मामे खान?
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या सट्टो या छोट्याशा गावाचे रहिवासी असणारे मामे खान आज राजस्थानच्या लोककलांचा अभिमान बनले आहेत. आपल्या कलेने त्यांनी जगभरात नाव कमावले आहे. आपल्या सुरेल आवाजाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मामे खान यांना ‘पद्मश्री पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात मामे खान बॉलिवूड कलाकारांसह रेड कार्पेटवर उपस्थित होते. हा मान मिळवणारे ते राजस्थानमधील पहिले कलाकार आहे. मामे खान लोककलांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या आवाजाची जादू पसरवत आहेत. नुकतेच त्यांनी अभिषेक बच्चनच्या 'दसवीं' चित्रपटातील 'म्हारा मन होयो नखरालों...' हे गाणे गायले आहे. गाण्यात अभिषेक दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करताना दिसला होता. मामे यांनी याआधी हृतिक रोशनच्या 'लक बाय चान्स'मधील 'बाओ रे' हे गाणे गायले आहे. ‘लक बाय चान्स’, ‘नो वन किल्ड जेसिका’ आणि ‘सोनचिडीया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.
संबंधित बातम्या
Cannes Film Festival : पंतप्रधान मोदींच्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा; भारत-फ्रान्स नात्यावर म्हणाले...
Cannes Film Festival 2022 : ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!
Cannes Film Festival 2022 : एक दिवस कान्स भारतात होईल; दीपिकाचा विश्वास