Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
एकदा धर्मेंद्र यांच्या घरी अनोळखी लोक घुसले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांनी काय केलं, हेही अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

Amitabh Bachchan on Dharmendra KBC: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र ( Dharmendra) आता आपल्यात नाहीत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. कुटुंबीय, चाहते आणि त्यांच्या सहकलाकारांकडून आजही धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. नुकतंच अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनी ‘कौन बनेगा करोडपती 18’ (KBC 18) मध्ये धर्मेंद्र यांच्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला. एकदा धर्मेंद्र यांच्या घरी अनोळखी लोक घुसले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांनी काय केलं, हेही अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
‘धरम जींचं घर सगळ्यांसाठी खुलं होतं’
'धर्मेंद्र यांच्या घराचे दरवाजे प्रत्येकासाठी कायम खुले असायचे. त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अगदी आपुलकीने स्वागत केले जायचे. धर्मेंद्र यांच्या मनात कोणाबद्दलही भेदभाव नव्हता. त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीला आपल्याच घरात आल्यासारखे वाटायचे. असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
ते म्हणाले, “मी तुम्हाला त्यांच्या घराबद्दल आणखी एक गोष्ट सांगतो. त्यांचं घर सगळ्यांसाठी खुलं होतं. जो कोणी त्यांच्या घरी यायचा, त्याला ते स्वतःचं घर असल्यासारखं वाटायचं.” यानंतर अमिताभ यांनी धर्मेंद्र यांच्या घरातील एका मजेशीर प्रसंगाची आठवण सांगितली.
घरात 4-5 अनोळखी लोक शिरले आणि...
अमिताभ बच्चन म्हणाले की, एकदा धर्मेंद्र घरी आले असता त्यांना चार-पाच अनोळखी व्यक्ती घराच्या पायऱ्या चढताना दिसल्या. हे लोक नेमके कोण आहेत, असा प्रश्न धर्मेंद्र यांना पडला. त्यांनी त्या लोकांना विचारले, “तुम्ही कोण आहात? इथे काय करत आहात?”त्यावर त्या व्यक्तींनी आपण गावाहून आलो असल्याचे सांगितले.
धर्मेंद्र यांना आपल्या घरी हे लोक कसे आले, याचे विशेष आश्चर्य वाटले नाही. त्यांना कदाचित त्यांच्या पत्नीनेच या लोकांना बोलावले असावे, असे वाटले. अमिताभ बच्चन यांच्या मते, धर्मेंद्र यांच्या घरात कोण येतंय, किती लोक येत आहेत, याची त्यांना अनेकदा कल्पनाही नसायची.
धर्मेंद्र यांच्या स्वभावाविषयीही भरभरून बोलले बिग बी..
अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या स्वभावाचे कौतुक करताना सांगितले की, ते प्रत्येकाचे प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत करायचे. त्यांचा स्वभाव अतिशय मनमोकळा होता. अमिताभ म्हणाले की, धर्मेंद्र यांचं मन खूप मोठं होतं. त्यांच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते आपलेपणाची वागणूक द्यायचे. त्यामुळेच धर्मेंद्र केवळ पडद्यावरचे ‘ही-मॅन’ नव्हते, तर त्यांच्या प्रेमळ आणि दिलदार स्वभावामुळेही ते लोकांच्या मनात कायमचे घर करून राहिले.
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची खास मैत्री
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांची जोडी विशेषतः ‘शोले’ या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झाली. या चित्रपटातील जय आणि वीरू ही त्यांची मैत्री आजही हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय मैत्रींपैकी एक मानली जाते.
दोघांनी ‘शोले’, ‘नसीब’, ‘चुपके चुपके’, ‘बंटवारा’, ‘छोटी सी बात’, ‘अंधा कानून’, ‘राम बलराम’ आणि ‘गुड्डी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी वेळोवेळी त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.






















