अभिनेत्री आयेशा झुल्काची नोकराविरोधात पोलिसांत तक्रार
आयेशा झुल्काने या घरगड्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्याच्या वर्तनाने व्यथित होऊन तिने हे पाऊल उचलल्याचं कळतं.
मुंबई : आयेशा झुल्का ही नव्वदच्या दशकातली अभिनेत्री. तिची जोडी जमली ती अक्षयकुमारसोबत. तिने इतरही सिनेमे केले. त्यात जो जिता वही सिकंदर या सिनेमाचा समावेश होतो. अशी ही नायिका कधीच चर्चेत नव्हती. पण आता मात्र तिने अचानक पोलिस स्टेशनचा रस्ता धरला आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे तिच्याकडे काम करणारा घरगडी.
आयेशा झुल्काने या घरगड्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्याच्या वर्तनाने व्यथित होऊन तिने हे पाऊल उचलल्याचं कळतं. खरंतर गेल्या काही वर्षांपासून हा गडी तिच्याकडे काम करतो. पण आता मात्र तिने पोलिसांत तक्रार करण्यावाचून पर्याय नव्हता. याचं कारणही तसंच आहे. या गड्याचं नाव आहे राम आंद्रे. तो तिच्याकडे काम करतो. पण अचानक आयेशा घरात नसताना मात्र त्याने केलेलं वर्तन त्याला भोवलं आहे. आयेशा घरी नसताना नोकराने आयेशाच्या घरातल्या पाळीव कुत्र्याला ठार मारलं आहे.
आयेशाकडे परदेशी ब्रिडचं कुत्रं होतं. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्याकडे ते होतं. अचानक एकदिवस आयेशा नसताना या आंद्रेने या कुत्र्याला मारून टाकलं आहे. आयेशाला त्याचं हे वर्तन अजिबात झेपलेलं नाही. त्याने असं का केलं त्याचंही उत्तर त्याच्याकडे नाही. मानसिक संतुलन ढळल्यामुळे त्याने असं पाऊल उचललं का तेही पाहायला हवं ,असं पोलीस म्हणतात. पोलिसांनी आंद्रेला अटक केली आहे. आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने आधी या कुत्र्याला त्रास दिला आणि मग मारलं आहे. त्याने दिलेला हा त्रास अनेकांनी पाहिला आहे. त्या सगळ्यांनी यासाठी पुढं यावं असं आवाहनही आयेशाने केलं आहे.