आमीरची आपल्या शिक्षकांना श्रद्धांजली, भाषा अभ्यासक प्रा. सुहास लिमये यांचे निधन
गिरगावचे मराठीचे प्राध्यापक डॉ. सुहास लिमये यांचं सैफी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. आमीरने ट्विटरवरून लिमये यांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबई : अभिनेता आमीर खान मराठी शिकत होता हे आपण सगळे जाणतो. अनेक कार्यक्रमांच्या मंचावर त्याने मराठीतून प्रेक्षकांशी, उपस्थितांशी संवाद साधला होता. हे मराठी त्याला शिकवत होते, गिरगावचे मराठीचे प्राध्यापक डॉ. सुहास लिमये यांचं सैफी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 75 वर्षांचे होते.
लिमये संस्कृतचेही पंडित होते. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. अनेक अमराठी लोकांना त्यांनी मराठी शिकवलं. लिमये प्रकाशात आले ते आमीर खानमुळे. आमीरला ते मराठी शिकवू लागले आणि आमीरला शिकवणारे सर असा त्यांचा उल्लेख होऊ लागला.
अमराठी लोकांसाठी सायनच्या तामिळ संघात त्यांनी मराठी आणि संस्कृत विनामूल्य शिकवलं. त्यांना दरम्यानच्या काळात कर्करोग झाला होता. पण त्यावर त्यांनी यशस्वी मात करून पुन्हा आपलं शिकवणं सुरू केलं होतं. आमीरने ट्विटरवरून लिमये यांना श्रद्धांजली वाहिली. मराठी तर त्यांनी शिकवलंच पण ते शिकवता शिकवता इतर अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो असंही त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
— Aamir Khan (@aamir_khan) September 3, 2020