धुळे, अहमदनगर महापालिकेसाठी आज मतदान
धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. धुळे महापालिकेची निवडणूक यंदा नेहमीपेक्षा चुरशीची होणार आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
धुळे/अहमदनगर : धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी आज मतदान होणार आहे. धुळे महापालिकेची निवडणूक यंदा नेहमीपेक्षा चुरशीची होणार आहे. कारण, भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपलाच आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. आज महापालिकेच्या एकूण 74 जागांसाठी मतदान पार पडणार असून धुळेकर कुणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
धुळे महापालिकेतील 19 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त याठिकाणी असणार आहे. व्हिडिओ कॅमेऱ्यासोबतच ड्रोन कॅमेऱ्यानेही मतदान केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे.
तर अहमदनगर महापालिकेसाठीही आज मतदान पार पडणार आहे. याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. कारण शिवसेना, भाजप वेगळे लढत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत आपलं आव्हान उभं केलं आहे. अहमदनगर महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी 351 उमेदवार आपले नशीब आजमावमार आहेत.
एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र उभारण्यात आली असून त्यातील 41 मतदान केंद्र अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षक या अधिकाऱ्यांसह 2 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर 2 हजार निवडणूक कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत.
अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीत जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे कधीही महापालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार, हे पहावं लागणार आहे.