Vinod Tawde : 5 कोटी वाटल्याच्या आरोपानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Vinod Tawde : 5 कोटी घेऊन वाटल्याच्या आरोप करण्यात आल्यानंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजप नेते विनोद तावडे यांनी नालासोपारा येथे पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजपा आणि बाविआमध्ये नालासोपारा तुफान राडा झालेला पाहायला मिळालाय. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत होटलमध्ये हा राडा झालाय. दरम्यान या प्रकरणी विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी 40 वर्ष राजकारणात आहे, कधीही पैसे वाटले नाहीत. सर्वांना भेटून निघणार होतो. एवढ्यात बहुजन विकास आघाडीला वाटलं की पैसे वाटत आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने माझी गाडी देखील तपासली आहे. मी वाटण्यासाठी आलोय, असा मित्र पक्षांचा गैरसमज झाला असल्याचे स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिले आहे.
एका विधानसभा मतदारसंघात जाऊन पैसे वाटत आहेत हा आरोप हास्यास्पद- प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर म्हणाले, विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते एका विधानसभेत जाऊन पैसे वाटत आहेत हा आरोप हास्यास्पद आहे. मविआच्या हातातून निवडणूक गेली हे त्यांच्या लक्षात आलंय. मविआने परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला. कल्याणकारी योजनांमुळे वातावरण चांगलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेली दगडफेक यात खरं काय समोर येईल. नालासोपारा येथे झालेला प्रकार हतबलतेने आणि पराभवाच्या भीतीतून करण्यात आलाय. क्षितीज ठाकूर यांनी दाखवलेली डायरी कुणी पहिली ? कोऱ्या संविधानासारखं त्यात काही लिहिलेलं आहे का ते पाहावं लागेल. प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करेल, असं स्पष्टीकरण दरेकर यांनी दिलं आहे.
विनोद तावडे पक्षाचा महासचिव आणि ते पैसे वाटत आहेत, संजय राऊत यांचा आरोप
संजय राऊत म्हणाले, भाजपाने कितीही लपवायाचा प्रयत्न केला तरी उघड झाला. त्यांचा खेळ संपलाय. विनोद तावडे पक्षाचा महासचिव आणि ते पैसे वाटत आहेत. भाजप आता यावर काय खुलासा करणार आहे? आचारसंहिता लागण्याआधी 10-15 कोटी पाठवले. शिंदेंचा राम रेपाळे नावाचा माणूस येतो आणि पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप आहेत. 23 तारखेनंतर राम रेपाळेला मी पाहणार आहे. आमच्या बॅगा , खिसे तपासता. विनोद तावडेंकडे 15 कोटी रू आहेत असं कळतंय. क्षितिज ठाकूर यांचे अभिनंदन. विनोद तावडे यांच्या संदर्भात जी माहीती आहे,ती अशी कळतेय की भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी ही माहिती दिली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस विकला जाणार नाही,असे जयंत पाटील म्हणालेत.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले आहे की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही. ही जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची जनता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या