Vice President Election : 2017 मध्ये UPA, 2022 मध्ये NDA उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या पक्षाचा मोठा निर्णय, उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदानापासून दूर राहणार
Vice President Election : उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान काही तासांवर आलेलं असताना ओडिशामधील बिजू जनता दलानं मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

Vice President Election 2024 नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2017 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत UPA ला आणि 2022 मध्ये एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेल्या नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलानं उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 7 राज्यसभा खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय झाला.
बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा यांनी मीडियासोबत बोलताना म्हटलं की बिजू जनता दलानं उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीजेडी एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांना समान अंतरावर ठेवेल. आमचं लक्ष्य ओडिशा आणि ओडिशाच्या साडे चार कोटी लोकांच्या विकास आणि कल्याणावर केंद्रीत आहे.
बीजेडीनं यापूर्वी उपराष्ट्रपती निवडणुकीत काय भूमिका घेतलेली?
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात बिजू जनता दलाची भूमिका बदलती राहिली आहे. 2012 मध्ये बिजू जनता दलानं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये बीजेडीनं विरोधी पक्षांच्या म्हणजेच यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. 2022 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणजेच जगदीप धनखड यांना पाठिंबा दिला होता. आता 2025 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत बीजेडीनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशाची विधानसभा निवडणूक झाली होती. त्या दोन्ही निवडणुकीत बीजेडीचा दारुण पराभव झाला होता. केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल ओराम यांनी बीजेडीच्या मतदानापासून दूर राहण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा अप्रत्यक्षपणे एनडीए उमेदवाराला पाठिंबा असल्याचं ते म्हणाले.
उपराष्ट्रपती पदासाठी मतदान कधी?
उपराष्ट्रपती पदासाठी मतदान 9 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सुरु होईल आणि 5 वाजता संपेल. उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. लोकसभेतील 542 आणि राज्यसभेतील 240 खासदारांना मतदानाचा अधिकार आहे. 782 खासदार मतदान करु शकतात. त्यामुळं या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी 392 खासदारांची मतं मिळणं आवश्यक आहे. सरकारकडे 427 खासदारांचा पाठिंबा आहे. ज्यामध्ये लोकसभेतील 293 आणि राज्यसभेतील 134 खासदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षांकडे 355 खासदार आहेत. यामध्ये लोकसभेतील 249 तर राज्यसभेत 106 खासदार आहेत. इंडिया आघाडी वगळता विरोधी पक्षात असणाऱ्या काही पक्षांचा मतदान कुणाला करणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
























