(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa : उत्पल पर्रिकर बंडखोरी करणार? भाजपने तिकीट न दिल्यास पणजीतून अपक्ष लढण्याची तयारी
मनोहर पर्रिकरांचे पूत्र असलेले उत्पल पर्रिकर हे पणजी मतदारसंघासाठी आग्रही आहेत. या ठिकाणाहून पक्षाने तिकीट दिलं नाही तर ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पणजी : गोव्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या पणजी मतदारसंघाबाबत भाजपचा अद्याप निर्णय झाला नाही. या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पूत्र उत्पल पर्रिकर आग्रही आहेत. भाजपने तिकीट न दिल्यास उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याची सूत्रांनी माहिती दिली.
गोव्यात मनोहर पर्रिकरांच्या पारंपरिक पणजी मतदारसंघातून त्याचे पूत्र उत्पल पर्रिकर इच्छुक आहेत. दिवाळीपासूनच उत्पल यांनी निवडणुकीची तयारी केलीय. पण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बाबुश मोन्सेरात यांना मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर उमेदवारी देण्यात आली होती. ते सध्या पणजीचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप उत्पल यांना उमेदवारी देण्याची शक्यता नसल्याचं दिसतंय.
केवळ पक्षनेत्यांची मुलं आहेत म्हणून उमेदवारी देण्याची भाजपमध्ये पद्धत नाही, असं भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितलं होतं. संसदीय मंडळच याबाबत निर्णय घेईल, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना भाजपची उमेदवारी मिळणार का? आणि उमेदवारी डावलली तर ते काय करणार? याबाबत उत्सुकता आहे.
पणजी गोव्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी देखील राहिली आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा हा मतदारसंघ. सध्या गोव्यात पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा इच्छूक आहे. पण, भाजप मात्र त्याबाबत अनुकूल नाही. असं असलं तरी उत्पल बंडखोरी करण्याची चर्चा देखील पणजीत सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आतापर्यंत दोन वेळा उत्पल पर्रिकर यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, उत्पल हे पणजीसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे.
उमेदवारी देत असताना साधारणपणे आर्थिक गोष्टींसह उमेदवार मतदारांना किती आकर्षित करू शकतो, आणि त्याचा राजकीय दबदबा किती आहे हेदेखील पाहिलं जातं. बाबूश मोन्सेरात यांचे तिसवाडी तालुक्यातील तालीगांव, साताक्रुझ, सातआंद्रे या ठिकाणी समर्थक आमदार आहेत. शिवाय, मोठ्या संख्येनं असलेल्या कॅथलिक मतदारांचा असलेला पाठिंबा ही देखील त्यांच्या जमेची बाजू. तर मनोहर पर्रिकर यांचा मुलगा, मनोहर पर्रिकर यांना मानणाऱ्या वर्गाचा पाठिंबा आणि स्वच्छ प्रतिमा या उत्पल पर्रिकर यांच्या जमेच्या बाजू.
गोव्यासारख्या राज्यात एक आमदार देखील महत्त्वाचा आहे. अशा वेळी या साऱ्या गोष्टींचा विचार स्वाभाविकपणे पक्ष नेतृत्वाकडून केला जाणार यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नाही, प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना टोला
- Goa Election 2022: ...तर गोव्यात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार- संजय राऊत
- काँग्रेस गोव्यात सिंगल डिजिट, तर यूपीत शून्य जागा; दोन राज्यांत, दोन नेत्यांची भविष्यवाणी