एक्स्प्लोर
Advertisement
वडील काँग्रेसमध्येच राहणार, राधाकृष्ण विखे-पाटलांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना सुजय विखेंकडून काट
अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुजय विखेंनी हे वृत्त फेटाळलं.
अहमदनगर : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना पुत्र सुजय विखेंनी पूर्णविराम दिला आहे. राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण सुजय विखेंनी दिलं आहे. विखेंचे मतभेद फक्त राष्ट्रवादीसोबत असल्याचंही सुजय विखेंनी सांगितलं.
अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुजय विखेंनी हे वृत्त फेटाळलं.
प्रश्न - तुमचे वडील भाजपमध्ये प्रवेश करणार का, हा प्रश्न एका अर्थाने निकालात निघाला?
उत्तर - माझे वडील कॉंग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये आणि सभेला येण्याचा प्रश्नच नव्हता. देशाचे पंतप्रधान माझ्यासाठी इथं आले त्याबाबत मी आनंदी.
प्रश्न - तुमचे वडील तुमच्यासाठी प्रचार करत आहेत, परंतु इथे सभेला आले नाहीत. यामुळे मतदारांमधे संभ्रम निर्माण होईल का?
उत्तर - मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रचार करणार नाहीत. ही निवडणूक पक्षीय पातळीवर नाही, तर व्यक्तिगत पातळीवर लढली जात आहे. त्यामुळे ते मुलगा म्हणून माझा प्रचार करत आहेत.
प्रश्न - या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले हे तुमचे विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे आहेत. त्यांचा काय अनुभव आहे?
उत्तर - ते प्रचार करतायत. ते भाजपसाठी काम करतायत. राजकारणात नातेसंबंध असणं काही गैर नाही. मात्र ते पक्षाचं काम करतील याबद्दल संशय नाही.
प्रश्न - तुम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळे दिलीप गांधी नाराज होते, ते इथं आज सभेला आल्यामुळे तुम्हाला हायसं वाटलं असेल पण गांधींना भाषण करताना थांबवण्यात आलं. त्यामुळे ते नाराज दिसले.
उत्तर - पंतप्रधान येण्याची वेळ झाली होती. आठवलेंचं भाषण राहिलं होतं. त्यामुळे त्यांना भाषण थांबवण्यास सांगण्यात आलं. मी नंतर त्यांच्यासोबत बोललो.
प्रश्न -तुम्ही तीन वर्षं तयारी करत होतात. मतदारसंघ पिंजून काढत होतात. पण तुमचं हे सगळं सुरु होतं ते कॉंग्रेसकडून. मात्र आता ऐनवेळी भाजपमध्ये गेल्याने लोकांनी कितपत स्वीकारलंय असं वाटतं.
उत्तर - सभा संपल्यानंतर लोक उभे राहिले आणि मला पुन्हा भाषण करावं लागलं. यातूनच याचं उत्तर जनतेने दिलंय.
प्रश्न - या निवडणुकीच्या निमित्ताने जुन्या आठवणी जागवल्या जातात. तुम्ही लहान असाल जेव्हा तुमचे आजोबा निवडणूक लढले होते. साधारणपणे हाच मतदारसंघ होता. तर बदला घेण्याची भावना तुमच्यामधे आहे का?
उत्तर - बदला कशाचा काय? माझे आजोबा गेली पन्नास वर्षे जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी काम करत होते. पाण्याच्या प्रश्नावर नदीजोड प्रकल्पाचं त्यांचं स्वप्न होतं. लोकांनी निवडून दिलं तर आजोबांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त पाण्याच्या प्रश्नावर काम करेन.
प्रश्न - तुमची लढत जरी संग्राम जगताप यांच्याशी असली तरी नकळतपणे विखे-पाटील विरुद्ध पवार या वादाचं स्वरुप त्याला येतं.
उत्तर - मी खूप छोटा माणूस आहे. मी गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्यासमोर फक्त विकासाचे मुद्दे आहेत.
प्रश्न - तुम्ही भाजपमध्ये, वडील कॉंग्रेसमधे असणं हे परतीचे मार्ग कायम रहावेत यासाठी आहे असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर - मी मुख्यमंत्र्यांशी देखील याबाबत पक्षप्रवेशावेळी बोललो होतो. आणि सांगितलं की आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे पक्षाशी नाही. याप्रश्नी आमचं एकमत आहे. आमचे पक्ष वेगळे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement