Solapur South Assembly constituency : मोठी बातमी : दक्षिण सोलापुरात पंचरंगी लढत, मविआत वाद सुरु असताना धर्मराज काडादी मैदानात उतरले
Solapur South Assembly constituency : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून धर्मराज काडादी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
Solapur South Assembly constituency : गेल्या काही दिवसांपासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादंग सुरु आहे. काँग्रेस पक्षाकडून दिलीप माने यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने ते आक्रमक झाले आहेत.
दक्षिण सोलापुरात भाजपने विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने तयारी केली होती. मात्र, ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर महाविकास आघाडीत वाद सुरु झाला होता. ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर दिलीप मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, शिवाय काँग्रेसबाबत नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, तिरंगी लढतीचं चित्र असतानाच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आणखी एका नेत्यानं एन्ट्री घेतली आहे. सिद्धेश्वर सहकारी करखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर काँग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने बाबा मिस्त्री हेही प्रहार जनशक्तीकडून मैदानात उतरले आहेत.
धर्मराज काडदींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आणखी एका मातब्बर नेत्यांची एन्ट्री केली आहे. सिद्धेश्वर सहकारी करखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी सोलापूर दक्षिण विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. धर्मराज काडादी हे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या समर्थनाथ मैदानात उतरले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाकडून दक्षिण सोलापुरातून उमेदवारी मागितली होती. शरद पवार गटाने धर्मराज काडादी यांना उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
किती उमेदवार मैदानात ?
सुभाष देशमुख - भाजप
अमर पाटील - ठाकरेंची शिवसेना
दिलीप माने - (काँग्रेस पुरस्कृत अपक्ष)
धर्मराज काडादी - अपक्ष
बाबा मिस्त्री - प्रहार जनशक्ती
काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची बंडखोरी
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांनी बंडखोरी केलीय. बाबा मिस्त्री यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत प्रहार जनशक्तीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 2019 च्या निवडणुकीत बाबा मिस्त्री हे काँग्रेसकडून दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवार होते. त्यावेळी त्यांना 57 हजार 976 मते मिळाली होती. या निवडणुकीत ही जागा ठाकरे गटाला सुटल्याने शिवाय काँग्रेसकडून दिलीप माने इच्छुक असल्याने बाबा मिस्त्री यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे बाबा मिस्त्री बंडखोरी करत प्रहार कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलय.
इतर महत्त्वाच्या बातम्या