कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
Kolhapur ZP and Panchayat Samiti Election: कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 68 गट आहेत तर पंचायत समितीचे 136 गण आहेत. मतदान 5 फेब्रुवारी होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (काल 21 जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अत्यंत चुरशीने इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यात आणि राधानगरी तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वात मोठी चुरस असल्याचे दाखल झालेल्या अर्जांवरून स्पष्ट झालं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 907 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंचायत समिती निवडणुकीसाठी 1530 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता येत्या मंगळवारपर्यंत दुपारी तीनपर्यंत यामधील किती उमेदवार मागे घेणार आणि किती जण रणांगणात राहणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 68 गट आहेत तर पंचायत समितीचे 136 गण आहेत. मतदान 5 फेब्रुवारी होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषद साठी सरासरी एका जागेमागे सरासरी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे उमेदवारांकडून अर्ज कायम राहिल्यास अनेक गटांमध्ये बहुरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत.
शौमिका महाडिक यांनी अर्ज भरला नाही
दुसरीकडे, भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी सांगितले की हा निर्णय आपला पूर्वीच झाला होता. त्यामुळे निवडणूक न लढवण्याबद्दल कार्यकर्त्यांची समजूत काढली असल्याचे त्या म्हणाल्या. कोल्हापूर जिल्ह्याने आम्हाला खूप काही दिलं आहे. एकदा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलं असल्याने कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पुन्हा रिंगणात न उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असं त्यांनी सांगितलं. याबाबतचा निर्णय माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतला होता, असे त्या म्हणाल्या.
शीतल फराकटे शिंदे गटात
दरम्यान, अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी झेडपीला उमेदवारी न मिळाल्याने पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना बोरवडेमधून शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या म्हणाल्या की, ज्या पक्षासाठी आणि ज्या नेत्यांसाठी मी अनेक वर्ष दिवस रात्र एक केला त्याच पक्षाने माझी उमेदवारी नाकारली. गेली तीन वर्ष हसन मुश्रीफ मला जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लाग असे सांगत होते. मात्र, असं काय झालं की त्यांनी माझी उमेदवारी नाकारली. माझा स्वाभिमान दुखावला आहे, मी माघार घेतली असती तर मी ताराराणीची लेक कसली? मी केवळ उमेदवारी मिळाली म्हणून राष्ट्रवादी सोडलेली नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोनवरून नेमकं काय झालं याचं कारण विचारलं. त्यांनी सुद्धा माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. रूपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी देखील माझ्याशी संपर्क करून विनंती केली. मी राष्ट्रवादी पक्षात असताना जी माझी शैली होती जो माझा बाणा होता तोच शिवसेनेतही राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या




















