एक्स्प्लोर
'सामना'तून टीका बंद होत नाही तोवर शिवसेनेशी भाजप चर्चा करणार नाही : सूत्र
आधी निकालांच्या आकड्यांवरून तर आज आर्थिक मंदीवरून ऐन दिवाळीत टीकेचे बाण सुटत असल्याने भाजपमध्ये शिवसेनेविरोधातील मत प्रवाह सक्रिय झाला आहे. अशीच टीका कायम राहिल्यास भाजप सेनेकडे सत्तास्थापनेसाठी कुठलाही प्रस्ताव न देण्याच्या विचारात असल्याचे देखील बोलले जात आहे.

GettyImage
मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेपूर्वी भाजप-शिवसेनेत मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी टीका थांबत नाही तोपर्यंत शिवसेनेशी चर्चा करायची नाही अशी भूमिका भाजपनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा उद्याचा मुंबई दौराही अनिश्चित मानला जात आहे. विधानसभा निकालानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप श्रेष्ठींवर होत असलेल्या टीकेमुळे भाजपात अस्वस्थता परसली आहे. राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्तास्थापनेची बोलणी सुरू होण्याआधीच पंतप्रधानांना लक्ष्य केलं जातं असल्याने भाजपमधल्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. आधी निकालांच्या आकड्यांवरून तर आज आर्थिक मंदीवरून ऐन दिवाळीत टीकेचे बाण सुटत असल्याने भाजपमध्ये शिवसेनेविरोधातील मत प्रवाह सक्रिय झाला आहे. अशीच टीका कायम राहिल्यास भाजप सेनेकडे सत्तास्थापनेसाठी कुठलाही प्रस्ताव न देण्याच्या विचारात असल्याचे देखील बोलले जात आहे. अडीच - अडीच वर्षं मुख्यमंत्रीपदाची मागणी करत असलेल्या शिवसेनेला डावलून सत्ता स्थापन करण्याच्या मागणीला जोर वाढला आहे. 2014 प्रमाणे सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करून सभागृहात बहुमताचा आकडा स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी पक्षात चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. काल सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं की, 2014 साली स्वतंत्र लढूनही भाजपानं 122 शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या. यावेळी स्वतःकडे सत्ता, युतीचं पाठबळ असूनही शिवसेना 56 वर थांबली. हा आकडा लहान वाटत असला तरी सत्तेचा रिमोट उद्धव ठाकरेंच्या हाती आला आहे. आयारामांचा जो बाजार भरवला तो शेअर बाजारासारखा कोसळला. 106 जागा जिंकूनही भाजपाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, असं शिवसेनेनं सामनात म्हटलंय. महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल आणि तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हातात महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल आणि तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हातात आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल एबीपी माझाशी बोलताना केला होतं. विविध आमदार शिवसेनेला समर्थन देत आहेत असंही राऊतांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेची ताकद नक्कीच वाढली असल्याचंही राऊतांनी सांगितलं होतं. शिवसेनेला कोणतीही अडचण नाही, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे महाराष्ट्राला लवकर कळेल पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे राऊत म्हणाले. होते सगळेजण आमचे मित्र आहेत. प्रत्येकालाच महाराष्ट्रात परिवर्तन हवं आहे. म्हणून असे निकाल लागले आहेत, असे देखील राऊत म्हणाले होते. राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, एकूण बलाबल पाहता सत्तेचा रिमोट कन्ट्रोल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे संजय राऊत यांनी परवाच्या सामनाच्या एका लेखातून म्हटले होते.
आणखी वाचा




















