Sharad Pawar : निकालाविरोधात न्यायालयात जाणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं...
Sharad Pawar : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhan sabha Elections results 2024) निकालाविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार आम्ही केलेला नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी केलं आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा लागलेल्या निकालात ईव्हीएमचा घोटाळा आहे, असा आरोप सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय. त्यावरही शरद पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महायुतीच्या कोणत्या मुद्द्यांचा फटका मविआला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसला यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
राज्याच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच प्रत्येक पक्षाने कंबर कसली होती. इतकच नव्हे तर शरद पवारही प्रचाराच्या रिंगणात उतरुन उमेदवारांसाठी स्वत: प्रचार करत होते. त्यामुळे महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल हा महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया मविआच्या नेत्यांकडून येत आहे. पण आता लागेलेला निकाल हा मान्य करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शरद पवारांच्या प्रतिक्रियेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. पण आता ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवार निकालाविरोधात न्यायालयात जाणार का?
निकालाविरोधात महविकास आघाडी न्यायालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता, आम्ही त्याचा विचार केलेला नाही, असं शरद पवारांनी म्हटलं. तसेच ईव्हीएमवर बोलताना शरद पवारांनी म्हटलं की, यासंदर्भात अधिक माहिती अद्याप माझ्याकडे नाही. काही जण म्हणतात की, गुजरातमधून आली आहे, काही म्हणतात की, मध्य प्रदेशमधून आलं आहे. पण यावर भाष्य करण्याइतकी माहिती माझ्याकडे नाही.
जनतेचा कौल आम्हाला मान्य - शरद पवार
विधानसभा निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की, हा जनतेचा निर्णय आहे आणि तो आम्हाला मान्य आहे. आम्ही आता पुन्हा नव्या जोमाने जनतेसमोर जाणार आहोत. लोकसभेनंतर आमच्यात अधिक विश्वास होता. मविआने विधानसभा निवडणुकांसाठी खूप काम केलं, कुणीही त्यामध्ये मागे राहिलेलं नाहीये.
विधानसभा निवडणुकांमध्ये मविआचा पराभव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निकालांमध्ये भाजपला 137, शिंदे गटाला 58, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीने एकूण 236 जागांवर विजय संपादित केला आहे. तसेच महाविकास आघाडीला एकूण 49 जागांवरच विजय मिळाला आहे. यामध्ये काँग्रेसला 16, ठाकरे गटाला 20 आणि शरद पवार गटाला 10 जागाला मिळाल्या आहेत.