Suresh Mhatre Aka Balya Mama: मोठी बातमी: भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
MP Suresh Mhatre meets Devendra Fadnavis in Mumbai: सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण. 5 तारखेला मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. यानंतर आता पुढील पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी हजर झाले. सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील (Kapil Patil) यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते. मात्र, आता विधानसभेच्या निकालानंतर सुरेश म्हात्रे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सागर बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. बाळ्या मामा यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र, बाळ्या मामा आणि फडणवीसांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येत्या 5 तारखेला मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने आझाद मैदानात तयारीही सुरु झाली आहे. यावेळी भाजपचे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, हे आता जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून सागर बंगल्यावर लगबग दिसत आहे. मंत्रीपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांनी सागर बंगल्यावर आज फडणवीसांची भेट घेतली. यामध्ये माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, अतुल सावे, प्रतापराव चिखलीकर ,चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा समावेश आहे.
अजितदादांचा सोनेरी काळ सुरु
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाला 'अच्छे दिन' येणार असल्याची चाहुल लागली आहे. कारण शरद पवार गट आणि ठाकरे गटातील काही नेते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटातील राहुल जगताप आणि मानसिंग नाईक हे अजितदादांच्या गटात जाणार असल्याची माहिती आहे. राहुल जगताप हे शपथविधीनंतर लगेच अजितदादा गटात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही सोमवारी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अपूर्व हिरे हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी: अमित शाह प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, दिल्लीतील महायुतीच्या बैठकीची Inside Story!