Sharad Pawar : देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं तर बारामती म्हटलं की कुणाचं नाव घेतात? आता हीच परंपरा युगेंद्र पवार पुढे नेतील : शरद पवार
Sharad Pawar Baramati Sabha : बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही काम केलं. त्यापेक्षाही अधिक जोमानं काम करण्याची हिंमत युगेंद्र पवारांमध्ये आहे. त्यांना विक्रमी मतांनी निवडून द्या असं आवाहन शरद पवारांनी केलं.
पुणे : देशाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी बारामती म्हटल्यावर कुणाचं नाव घेतात? असा प्रश्न शरद पवारानी विचारताच बारामतीकरांकडून 'शरद पवार, शरद पवार' असा जल्लोष सुरू झाला. बारामतीच्या विकासाची परंपरा आता युगेंद्र पवार पुढे नेतील, त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा असं आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केलं. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली.
शरद पवार म्हणाले की, युगेंद्र पवार हे परदेशातून शिकून आले आहेत. आज ते बारामतीमध्ये समाजकार्य करतात. बारामतीकरांचा विकास करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. त्यावर काही लोक म्हणतात, मग आम्ही मी काय करू? 1967 साली मला तुम्ही आमदार केलं. नंतर मुख्यमंत्री झालो. मला 30 वर्षे दिली. त्यानंतर अजित पवारांना संधी दिली. त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री केलं. त्यांनी काम केलं. पण आता पुढच्या कामासाठी तरूण पिढीची गरज आहे. युगेंद्रची प्रश्न समजून घ्यायची तयारी आहे. काय करावं लागतंय हे त्यांना समजतंय. त्यांच्या काम करण्याची पद्धत बारामतीकरांना आवडेल.
बारामती म्हटल्यावर कुणाचं नाव घेतात?
शरद पवार म्हणाले की, "देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा. बारामती म्हटल्यावर कुणाचं नाव घेतात? आता युगेंद्र पवार तीच परंपरा कायम ठेवतील. त्यामुळे त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा. आम्ही ज्या पद्धतीने विकास केला त्याच्यापेक्षाही अधिक जोमाने युगेंद्र पवार विकास करतील."
महायुतीवर टीका
शरद पवार म्हणाले की, "महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली, पण गेल्या दोन वर्षांत 67 हजार महिलांवर अत्याचार झाला आणि 64 हजार मुली बेपत्ता आहेत. यावर उत्तर देण्याची धमक महायुतीच्या नेत्यांमध्ये नाही असं सांगत शरद पवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली. शरद पवारांनी बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी सांगता सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं."
गेल्या निवडणुकीला बारामतीकरांनी मोठं मताधिक्य दिलं. सुप्रिया सुळेंना साथ दिली. आता विधानसभेची निवडणूक होत असून त्यामध्येही काळजी घेण्याची गरज आहे असं सांगत शरद पवार म्हणाले की, "ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. बहिणीचा सन्मान करायचा असेल तर काही अडचण नाही. पण दोन वर्षांपासून महिलांवर किती अत्याचार झाले याची आकडेवारी मोठी आहे. आपल्या राज्यामध्ये 67,381 महिलांवर अत्याचार झाल्याचं समोर आलं. महाराष्ट्रामध्ये 64 हजार मुली बेपत्ता आहेत. जे म्हणतात लाडकी बहीण म्हणतात, त्यांना या 64 हजार मुली कुठे बेपत्ता झाल्या हे सांगण्याची धमक नाही."
शेतकऱ्यांची काय चूक?
सरकारच्या धोरणावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, "बारामती आणि आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्यांचा आहे. महायुतीच्या काळात राज्यामध्ये 20 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये त्यांची काय चूक होती? राज्यसरकारच्या धोरणांमुळे ते कर्जबाजारी झाले. दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकारने देशातील 16 उद्योगपतीचे 18 हजार कोटींचे कर्ज माफ केलं. हे सरकार शेतीमालाला किंमत देत नाही."
लोकसभेनंतर आता विधानसभेतही बारामतीमध्ये नात्यागोत्यांची लढाई सुरू झाली आहे. या आधी लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतील सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्याची लढत सुरू आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा: