Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीनंतर मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला.
Mumbai University Senate Election 2024 मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने (Yuvasena) पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. दोन वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवासेनेने विजय मिळवला आहे. या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला.
आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहाच्या दहा दहा जिंकून भाजप प्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP चा धुव्वा उडवला आहे. युवासेनेने ज्याप्रकारे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर युवासेनेकडून आज मातोश्रीवर दुपारी बारा वाजता एक मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच सर्व विजयी उमेदवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतील.
युवासेनेच्या सर्व विजयी उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी प्रमाणपत्र दिले. यामध्ये 5 जागांसाठी खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले. तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज ( DT/NT) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून मयुर पांचाळ आणि महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले.
निकालानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले की, पुन्हा एकदा 10 पैकी 10...ज्यांनी मतदान केलं, त्याचं मनापासून आभार...आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल शिवसेना आणि युवासेनेकडून धन्यवाद...मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही फक्त पुनरावृत्ती केली नसून आमची कामगिरी देखील सुधारली आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच 100 टक्के स्ट्राइक रेट...इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो, असं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.
10 on 10 it is!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 27, 2024
Once again!!
To all those who voted for us, and to all the Shiv Sena + Yuva Sena colleagues, a big thank you for your trust, support, effort and blessings.
We have not only repeated but bettered our performance at the Mumbai University Graduate Senate…
एकूण 28 उमेदवार होते रिंगणात-
मतपत्रिकांची छाननी झाल्यानंतर आणि मतपत्रिका वैध-अवैध ठरवल्यानंतर पसंती क्रमांक नुसार मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामध्ये 7200 पैकी 6684 मतपत्रिका यावेळी वैध ठरल्या. खुल्या प्रवर्गासाठी साधारणपणे 1114 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहा जागांवर उमेदवार उभे केले होते. ते भाजपप्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही दहा उमेदवार दिले होते. इतर आठ उमेदवार धरून या निवडणुकीत एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.